कवठेमहांकाळ : पिंपळवाडीच्या माजी सरपंचाच्या भाच्याला भोसकले

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन –  सांगली जिल्ह्यातील ह्या आठवड्यामध्ये दोन धक्कादायक घटना घडल्या आहेत. दोन दिवसापूर्वी बोरगाव ग्रामपंचायत सदस्याचा खून करण्यात आला. त्यानंतर आता कवठेमहांकाळ तालुक्यात हादरून सोडणारी घटना घडली आहे. तेथील पिंपळवाडीचे माजी सरपंच रमेश खोत यांचा भाचा अमर जयराम आटपाडकर (वय, २५) याला दोघा अज्ञातांनी भोकसले आहे. हि घटना शनिवारी सकाळी साडेनऊच्या दरम्यान घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कवठेमहांकाळ तालुक्यातील धुळगाव रस्त्याच्या मुख्य चौकात अमर याच्यावर हल्ला करण्यात आला. यामध्ये अमर याचा मित्र विजय हा जखमी झाला आहे. तर अमर याच्या छातीवर, पोटावर आणि डोक्यात आणि इतर ठिकाणी वार केले आहे. अज्ञात दोघे वार करून पळून गेले. अमर आटपाडकर याची परिस्थिती गंभीर असल्याचे समजते. त्याच्यावर कवठेमहंकाळ येथील हॉस्पिटलमध्ये उपचार करून पुढील उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात नेले आहे.

दरम्यान, माजी सरपंच रमेश खोत हे हरोली गावाचे माजी सरपंच युवराज पाटील यांच्या खून प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी असून, पोलिस याबाबत तपास करीत आहेत.