आटपाडीतून तब्बल 16 लाखांचा बकरा चोरीला, अलिशान कारमधून पळवला ! सांगली जिल्ह्यात खळबळ

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – गोठ्यात बांधलेला तब्बल 16 लाख रुपये किंमतीचा महागडा बकरा चोरट्यांनी आटपाडी येथून चोरून नेला आहे. शनिवारी (दि. 26) पहाटे चोरट्यांनी अलिशान कारमधून हा बकरा पळवल्याचे समजते. एवढ्या महागड्या बकऱ्याची चोरी झाल्याने आटपाडी शहरासह संपूर्ण सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

आटपाडीचे रहिवासी सोमनाथ जाधव यांनी हा बकरा तब्बल 16 लाख इतकी किंमत मोजून खरेदी केला होता. विशेष म्हणजे दीड कोटी रुपये किंमत असलेला मोदी बकरा (Modi Goat) याच्या वंशाचा हा बकरा होता. सांगोला तालुक्यातील चांडोलवाडी येथील बाबुराव मेटकरी यांचा मोदी नावाचा प्रसिद्ध बकरा दीड कोटी रुपयांचा आहे. त्याला आटपाडीच्या बाजारात 70 लाख रुपये इतका प्रचंड दराने मागणी झाली. पण तो त्यांनी विकला नाही. याच दीड कोटी किमतीच्या मोदी बकऱ्याचा अंश असलेल्या सहा महिने वय असलेल हे पिल्लू होत. सोमनाथ जाधव यांनी ते 16 लाख रुपयांना खरेदी केले होते.

दरम्यान, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या आटपाडीला कार्तिक पौर्णिमेला यात्रा भरते. ही यात्रा खूप प्रसिद्ध असते. येथे जनावरांचा मोठा बाजार भरतो. दोन्ही राज्यांतील मेंढपाळ येथे मोठ्या संख्येने येतात. या वर्षी मात्र कोरोनामुळे आटपाडीची कार्तिक पौर्णिमेची यात्रा रद्द झाली. येथे महागडे बकरे बाजारात विक्रीसाठी येतात. त्यांची बोली ही लाखांच्या घरात असते.