Sachin Vaze Case : फडणवीसांच्या आरोपावर संजय राऊतांचा पलटवार, म्हणाले – ‘हमाम मे सब नंगे होते है !’

नवी दिल्ली  : वृत्तसंस्था – सचिन वाझे प्रकरणात आज मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची राज्य सरकारने उचलबांगडी केली. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर हल्लाबोल करत गंभीर आरोप केले. देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद संपताच शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर पलटवार केला आहे.

पत्रकारांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, कुणाच्या राज्यात कोण वसुली करत होते आणि वसुली इनचार्ज कोण होते, यासंदर्भात किमान राजकारणातल्या लोकांनी बोलू नये. हमाम मे सब नंगे होते है, असे म्हणत राऊत यांनी फडणवीस यांच्यावर पलटवार केला. तसेच परमबीर सिंह यांची बदली हा मुद्दाच नाही, असे देखील राऊत यांनी सांगितले.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
परमबीर सिंह यांची बदली करण्यात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत ते म्हणाले, सचिन वाझे हे काहींसाठी वसुली एजंटचे काम  करतात. त्यांचे खरे ऑपरेटर कोण आहेत  हे शोधून काढले पाहिजेत, असा आरोप फडणवीस यांनी केला होता.

सरकारच कुणी केस वाकडा करु शकत नाही
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना राऊत म्हणाले, परमबीर सिंह याची बदली हा मुद्दाच नाही. ज्या प्रकारे राज्यातलं वातावरण बनलं होतं, त्यावर मुख्यमंत्र्यांना वटलं की ज्या अधिकाऱ्यांवर शंका आहे, त्याचा तपास होईपर्यंत त्यांची बदली व्हावी. मात्र विरोधकांना हा मुद्दा मोठा आहे. पण हा मुद्दाच नाही. जर विरोधकांना याचा मुद्दा बनवायचा असेल तर त्यांनी पुढची साडेतीन वर्षे बनवत रहावे. सरकारचा केसही कुणी वाकडा करु शकत नाही, असे राऊत म्हणाले.