संजय राऊतांचा मोदी सरकारला खोचक टोला, म्हणाले – ‘पेट्रोल-डिझेलची दरवाढ रामराज्यात वावणाऱ्यांना शोभत नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – इंधन दरवाढीवरून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या व्यक्तव्याचा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. पेट्रोल-डिझेलची दरवाढ तुम्हाला धर्मसंकट वाटत असेल तर धर्माचे राजकारण करू नका, असे सांगत देशातील जनतेचे महागाईपासून रक्षण करणे हे कुठल्याही सरकारचे काम आहे. व्यापारात फायदा होतो की तोटा हे बघायला सरकार बसलं नाही. आपण रामराज्यात राहतो. पण बाजूला असलेल्या सीता आणि रावण यांचा जन्म झालेल्या देशात म्हणजे नेपाळ आणि श्रीलंकेत पेट्रोल, डिझेल स्वस्त आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलची दरवाढ रामराज्यात वावरणाऱ्यांना शोभत नाही, असा टोला खासदार राऊत यांनी लगावला आहे.

खासदार संजय राऊत शुक्रवारी (दि. 26) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, पेट्रोल-डिझेल धर्मसंकट वाटत असेल तर धर्माचे राजकारण करू नका. सत्ताही भाजपला श्रीरामाच्या नावावर म्हणजे धर्माच्या नावावर मिळाली आहे. राजकारणात धर्माला जास्त महत्त्व दिले जात आहे. लोकांची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे पेट्रोल- डिझेल दरवाढ करणे. या दरवाढीसंदर्भातील धर्मसंकट यूपीए सरकारवरही होते. पण माजी पंतप्रधान मनमोहन सिंग नेहमी संकटाचा सामना करायचे. तुम्ही तर पळ काढत आहात, असा खोचक टोलाही खासदार राऊत यांनी मोदी सरकारला लगावला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामींनी राम, रावण आणि सीतेच्या जन्मस्थळांचा उल्लेख करून ट्विट करत टीका केली होती. त्यात म्हटले होते की, प्रभू रामाच्या भारतात पेट्रोलचे भाव सर्वाधिक आहेत. तर शेजारीच असलेल्या नेपाळ आणि श्रीलंकेत हे दर कमी आहेत, असे स्वामींनी म्हटले होते. प्रभू रामाच्या भारतात पेट्रोलची किंमत प्रति लिटर 93 रुपये आहे. सीतेच्या नेपाळमध्ये पेट्रोलची 53 रुपये आहे. तर रावणाच्या लंकेत पेट्रोलचे भाव 51 रुपये आहेत, असा टोला सुब्रमण्यम स्वामींनी लगावला होता.