पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या सौंदर्यीकरणासाठी तब्बल ‘एवढया’ कोटींचा प्रस्ताव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – औरंगाबादजवळील पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा संपूर्ण कायापालट करणार असून, २०० एकर जागेवर असलेल्या उद्यानाच्या सौंदर्यीकरणासाठी ४० कोटींचा प्रस्ताव केला असल्याचे सांगत देश-विदेशातील पर्यटकांना तिथे आकर्षित करण्यासाठी लोकांकडून नावीन्यपूर्ण कल्पना तर मागवाच, तसेच जागतिक स्तरावरील सल्लागार नियुक्त करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दिले.

वर्षा येथील समिती सभागृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, रोजगार हमी योजनामंत्री संदीपान भुमरे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जामंत्री नितीन राऊत उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, पैठणला एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. या ठिकाणी जायकवाडीसारखे देशातले मोठे धरण आहे. संत ज्ञानेश्वर उद्यान जागतिक दर्जाचे उद्यान या ठिकाणी बनले पाहिजे. यासाठी लोकांमधून तर चांगल्या नावीन्यपूर्ण कल्पना मागवा, असे त्यांनी जलसंपदा विभागाला सांगितले. उद्यानाच्या सौंदर्यीकरणासाठी ४० कोटींचा प्रस्ताव केला आहे. या ठिकाणी वॉटर पार्क, खेळणी व प्राणिसंग्रहालय, थीम पार्क असे उभारण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी एमटीडीसीच्या ७ जागा विकसित करणे सुरू असून, संत ज्ञानेश्वर उद्यानासारखी मोठी जागा विकसित करताना आंतरराष्ट्रीय पातळीवरील सल्लगार असावा, अशी सूचना केली.