माजी पोलिस आयुक्तांच्या अटकेच्या मागणीसाठी CBI ची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : शारदा चिट फंड घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) सर्वोच्च न्यायालयाला कोलकाताचे माजी पोलिस आयुक्त राजीव कुमार (Former Commissioner of Police Rajiv Kumar) यांच्या अटकेची आणि ताब्यात घेऊन चौकशीची मागणी केली आहे. राजीव कुमार तपासात सहकार्य करत नसल्याचे सीबीआयचे (CBI) म्हणणे आहे. गेल्या वर्षी 1 ऑक्टोबरला कोलकाता उच्च न्यायालयाने त्याांना जामीन मंजूर केला होता. राजीव कुमार (Rajiv Kumar)
यांना हायकोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यानंतर 14 महिन्यांनंतर सीबीआयने जामीन रद्द करावा आणि कोठडीत चौकशी करण्याची परवानगी मिळावी यासाठी अर्ज दाखल केला आहे.

शनिवारी सायंकाळी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत सीबीआय म्हणाले की, जामीन देताना हे स्पष्ट केले होते की राजीव कुमार तपासात सहकार्य करतील. तपासासंदर्भात पुरावा गायब झाल्याची माहिती त्यांना आहे, म्हणूनच त्यांना अटक व कोठडीत चौकशी होणे आवश्यक आहे.

कोलकाताचे माजी पोलिस आयुक्त राजीव कुमार हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय मानले जातात. 2014 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शारदा घोटाळा प्रकरणाचा तपास अन्य चिट फंड प्रकरणांसह सीबीआयकडे सोपविला. यापूर्वी घोटाळ्याच्या चौकशीसाठी पश्चिम बंगाल सरकारने तयार केलेल्या एसआयटीमध्ये राजीव कुमार महत्त्वपूर्ण सदस्य होते. गेल्या वर्षी 1 ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयाने राजीव कुमार यांना जामीन मंजूर केला तेव्हा सीबीआयने तत्काळ सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यानंतर 29 नोव्हेंबर रोजी राजीव कुमार यांना नोटीस बजावण्यात आली. पण त्यानंतर खटला प्रलंबित होता. सीबीआयचे म्हणणे आहे की, शारदा संचालक सुदिपता सेन, देबजनी मुखर्जी आणि टीएमसीच्या अनेक वरिष्ठ राजकारण्यांचे हे मोठे षड्यंत्र उलगडले जावे आणि तपासाला त्याच्या निष्कर्षापर्यंत नेले पाहिजे. सीबीआयचे म्हणणे आहे की, राजीव कुमार यांनी टीएमसीचे वरिष्ठ नेते आणि शारदा चिट फंड्सच्या संचालकांना संरक्षण देण्यासाठी कॉल डेटा रेकॉर्डमध्ये छेडछाड करुन पुरावे मिटविण्याचे काम केले आहे.

शारदा कंपनीने पश्चिम बंगालमध्ये बर्‍याच पोंझी योजना चालवल्या, त्यामध्ये कोट्यवधी लोकांची फसवणूक झाली. 2013 मध्ये भंडाफोड झााल्याने हजारो कोटी रुपये बुडाले. त्याच वर्षी प्रवर्तक सुदीप्त सेन यांना अटक करण्यात आली.