शरद पवारांच्या आवाहनानंतर साखर कारखान्यांनी पहिल्यांदाच घेतला ‘हा’ मोठा निर्णय

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता ‘साखर कारखान्यांनी कोविड केअर सेंटर’ सुरु करावेत या जेष्ठ नेते शरद पवार यांच्या सूचनेची कार्यवाही जिल्ह्यात लगेचच होतात दिसत आहे. वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याने पवारांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तातडीने १०० खाटांचे रुग्णालय सुरु करण्याची तयार दाखवली आहे. त्यासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केल्याचे चेअरमन विशाल पाटील यांनी सांगितले.

पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी रुग्णांना खाटा मिळत नाही. तसेच वेळेवर उपचार मिळत नसल्याने रुग्णांचा मृत्यूदर वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर रविवारी कराड येथे झालेल्या बैठकीत शरद पवार यांनी साखर कारखान्यांनी कोरोना उपचार केंद्र सुरु करावेत, अशी सूचना केली होती. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद सांगलीतील वसंतदादा पाटील साखर कारखान्याने १०० खाटांचे रुग्णालय सुरु करण्याची तयारी दर्शवली. कारखान्याचे चेअरमन विशाल पाटील यांनी कारखान्याच्या संचालक आणि सभासदांशी चर्चा करुन रुग्णालय सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याकडे जागेची उपलब्धता असून, रुग्णालय आरोग्य यंत्रणेच्या मदतीला कारखान्यातील कर्मचारी देण्यास सुद्धा त्यांनी तयारी दर्शवली आहे.

यासाठीचा प्रस्ताव सांगली महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे पाठवला असून त्यांनी जागेची तात्काळ पाहणी केली आहे. तर सभासदांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे प्रस्ताव दिला आहे. गरज पडल्यास कारखाना प्रशासन रुग्णालय चालवेल, असा विश्वास सुद्धा कारखाना प्रशासनाने व्यक्त केला. दरम्यान, रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने यावर निर्णय घ्यावा, असे आवाहन विशाल पाटील यांनी केलं.