सावळ : सरपंचपदी ज्योती आवाळे, तर उपसरपंचपदी फक्कड बालगुडे; गावचा विकास हाच आमचा ध्यास

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – सावळ (ता. बारामती, जि. पुणे) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ज्योती दीपक आवाळे, तर उपसरपंचपदी फक्कड तुकाराम बालगुडे यांची निवडणूक अध्यासी अधिकारी एम. बी. सय्यद यांनी बिनविरोध निवड जाहीर केली. नवनिर्वाचित सरपंच-उपसरपंच जाहीर होताच कार्यकर्त्यांनी ताशाच्या गजरात गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला.

निवडणूक अध्यासी अधिकारी म्हणून मंडलाधिकारी एम. बी. सय्यद, तलाठी टी. एस. चोरमले आणि ग्रामसेवक आर. एस. गौड यांनी सरपंच आणि उपसरपंच निवडणुकीचे कामकाज पाहिले. निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे ग्रामस्थांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जय हनुमान पॅनेलचे विजयी उमेदवार सरपंच ज्योती आवाळे, उपसरपंच फक्कड आवाळे, सुनिता आवाळे, सारिका आटोळे, रोहिणी खोमणे, नितीन भिसे यांचा पॅनेलप्रमुख दत्तात्रय आवाळे, संतोष आटोळे, रमेश साबळे, विठ्ठल आटोळे, सोमनाथ खोमणे, तानाजी बालगुडे, सुनील बालगुडे यांनी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार केला.

मंडलाधिकारी सय्यद म्हणाले की, सरपंचपदासाठी ज्योती आवाळे आणि उपसरपंचपदासाठी फक्कड बालगुडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला, त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. ग्रामस्थ आणि नवनिर्वाचित सदस्यांनी समंजसपणाची भूमिका घेतली, ही बाब कौतुकास्पद आहे. त्यामुळे गावामध्ये शांततामय वातावरण होते, असे त्यांनी सांगितले.

तलाठी टी. एस. चोरमले यांनी सांगितले की, सरपंच-उपसरपंच निवडणूक प्रक्रियेमध्ये ग्रामस्थांनी सहकार्याची भावना ठेवली, त्यामुळे कोणताही अडथळा आला नाही. परिस्थितीचे भान ठेवून काम केले, तर कोणतीही अडचण येणार नाही. गावच्या विकासासाठी प्रशासनाकडून नेहमीच सहकार्याची भूमिका असते, असे त्यांनी स्पष्ट केले.

नवनिर्वाचित सरपंच ज्योती आवाळे म्हणाल्या की, ग्रामस्थांनी आमच्यावर मोठी जबाबदारी सोपविली आहे. सर्वांना बरोबर घेऊन गावचा विकास साधण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. रस्ते, पाणी, वीज अशा मुलभूत सुविधांसह शासकीय योजनांचा सामान्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून दिला जाईल. नागरिकांनीही विकास करताना विरोधासाठी विरोध करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, उपसरपंच फक्कड बालगुडे म्हणाले की, आपसातील हेवेदावे, मतभेद बाजूला ठेवून गावचा विकास करायचा आहे. मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवून समाजसेवा करण्याची संधी दिली आहे. शिक्षण आणि आरोग्य सुविधा चांगल्या देण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे, त्यासाठी जुन्या अनुभवी आणि ज्येष्ठ मंडळींचा सल्लाही घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.