SBI चा 44 कोटी ग्राहकांना झटका ! बचत खात्याच्या व्याज दरात ‘कपात’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI ने आपल्या कोट्यावधी ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. बँकेने मंगळवारी बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजदरात घट करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बँकेच्या सर्व बचत खात्यांवर जमा रक्कमेवर व्याज दर कमी झाला असून तो 0.25 टक्क्यांनी कमी करुन 2.75 टक्के करण्याची घोषणा करण्यात आली आहे. नवे दर 15 एप्रिल 2020 पासून लागू होतील. यासह बँकेने मंगळवारी 10 एप्रिलपासून सर्व कालावधीच्या कर्जावरील मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट्समध्ये 0.35 टक्क्यांची कपात करण्याची घोषणा केली आहे.

एसबीआयकडून सांगण्यात आले की बचत व्याज दरात 0.25 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. या कपातीनंतर बचत खात्यावर 3 टक्क्यांऐवजी 2.75 टक्के व्याज मिळेल.

एसबीआयने स्वस्त केले कर्ज –

एसबीआयने 10 एप्रिलपासून एमसीएलआरमध्ये 0.35 टक्क्यांची कपात करण्याची घोषणा केली आहे. बँकेने सांगितले की एमसीएलआरमध्ये कपातीनंतर एका वर्षांच्या कालावधीच्या कर्जावरील व्याजदर 7.75 टक्क्यांवरुन 7.40 टक्के केला जाईल.

गृह कर्जाच्या EMI मध्ये होणार इतकी बचत –

एसबीआयकडून सांगण्यात आले की या कपातीसह गृह कर्जाच्या ईएमआय प्रति लाखाच्या हिशोबाने 24 रुपये कमी करण्यात आला आहे.