भारतात कोरोनाचा दुसरा बळी, राजधानी दिल्लीत महिलेचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसने देशात दुसरा बळी घेतला आहे. पहिला बळी कर्नाटकातील कलबुर्गीमध्ये झाला. आता दिल्लीत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. 69 वर्षाच्या या महिलेवर दिल्लीतील राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. कोरोनाच्या रुग्णावर दिल्लीत राम मनोहर लोहिया हॉस्पिटल आणि सफदरजंग हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या महिलेला तिच्या मुलामुळे करोनाचा संसर्ग झाला होता. तिचा मुलगा जपान, जिनेव्हा आणि इटलीचा दौरा करून दिल्लीत घरी परतला होता. तपासणीत त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. मृत महिलेचा मुलगा 46 वर्षाचा आहे. त्याच्या कुटुंबातील सर्वांची कोरोनाची तपासणी करण्यात आली.

कुटुंबातील सर्वांची तपासणी करण्यात आली मात्र आईला सोडून कोणालाही कोरोनाची लागण झाली नसल्याचे तपासणीत स्पष्ट झालं. यानंतर मुलावर आणि त्याच्या आईवर राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरू होते. यात आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला. भारतात कोरोनामुळे मृत्यू झालेला हा दुसरा मृत्यू आहे.