Corona Vaccination : लसीकरणाचा दुसरा टप्पा ! 16 फेब्रुवारीपासून पोलिस, महसूल अन् शिक्षकांना मिळणार लस

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाची लस उपलब्ध झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसाकरण करण्यात येत आहे. त्यानंतर राज्यातील 70 लाख फ्रंटलाईनवरील कर्मचाऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात लस टोचली जाणार आहे. राज्यात लसीकरणाचा दुसरा टप्पा 16 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. यामध्ये पोलीस, शिक्षक आणि महसूल कर्मचाऱ्याचा समावेश असणार आहे. तसेच प्रतिबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या महापालिका व अन्य शासकीय विभागांमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

पोलीस अधीक्षक- आयुक्तांना पत्र

दुसऱ्या टप्प्यात पोलिसांना लस टोचण्यात येणार आहे. प्राधान्याने लस कोणाला द्यायची अशा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती तात्काळ द्यावी, असे पत्र पोलीस महासंचालक कार्यालयाने सर्व जिल्ह्यांमधील पोलीस अधीक्षक व पोलीस आयुक्तांना पाठवले आहे.

1 फेब्रुवारीपासून माहिती अपलोड करण्याचे आदेश

कोरोनावरील प्रतिबंधित लस तयार झाल्यानंतर कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन अशा दोन प्रकारची लस आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचली जात आहे. वैद्यकीय कर्माचाऱ्यांना लसीकरण करताना 55 वर्षावरील कर्मचारी, आजारी असलेल्या कर्मचाऱ्यांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्याचे पहायला मिळत आहे. आता फ्रंटलाईनवरील कर्मचाऱ्यांना लस टोचण्यात येणार आहे. आजपासून (1 फेब्रुवारी) या सर्व कर्मचाऱ्यांची माहिती अपलोड करण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाने संबंधित विभागप्रमुखांना दिले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी त्यासंबंधीच्या सूचना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. माहिती अपलोडिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु केला जाणार आहे.

माहिती अपलोड करण्यात अडचणी

कोरोना लसीचा काळाबाजार रोखण्यासाठी लसीकरणाची सर्व माहिती एका अ‍ॅप्लिकेशनवर भरणे बंधनकारक आहे. परंतु मागील दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्याने माहिती अपलोड करण्यास अडचणी येत आहे. अशा तक्रारी आरोग्यअधिकाऱ्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. अर्चना पाटील यांच्या समोर मांडल्या. त्यावर अद्याप उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने 15 फेब्रुवारी पर्यंत सर्व कर्मचाऱ्यांची माहिती भरावीच लागणार आहे, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना रोखण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी, महसूल विभागातील कर्मचारी आणि को-मॉर्बिड रुग्णांचा सर्व्हे करणाऱ्या शिक्षकांना दुसऱ्या टप्प्यात लस टोचली जाणार आहे.

महत्त्वाचे मुद्दे

– लसीकरणाचे महत्त्व पटवून द्या, अफवा पसरविणाऱ्यावर थेट गुन्हे दाखल करा

– 16 फेब्रुवारीपासून फ्रंटलाईनवरील प्रत्येक कर्मचाऱ्यांना लस टोचणार

– पोलीस, महसूल व शिक्षकांची माहिती 15 फेब्रुवारी पर्यंत अपलोड करावी

– आठवड्यातील सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार व शनिवारी लसीकरण

– लसीकरण केंद्रातून आता प्रत्येकी दोनशे जणांना लस टोचली जाणार, केंद्र वाढवण्याची मुभा