ओवैसींच्या समोर ‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणणार्‍या ‘अमूल्या’विरूध्द राष्ट्रद्रोहाचा FIR, 14 दिवस ‘जेल’

बेंगळुरू : पोलीसनामा ऑनलाइन – नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधातील आंदोलनात एआयएमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या उपस्थितीत व्यासपीठावरून पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणारी अमूल्या लियोनाच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमूल्याला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

अमूल्याच्या वक्तव्यावर तिच्या वडीलांनीही नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, अमूल्याने जे म्हटले आहे, ते सहन करणार नाही. मुलीने अँटी सीएए रॅलीत जे केले, ते पूर्णपणे चुकीचे होते. तिने जे म्हटले आहे ते सहन केले जाणार नाही. मी अनेकदा तिला सांगितले की, मुस्लिमांच्या संपर्कात राहू नकोस. तसेच प्रक्षोभक वक्तव्य करू नकोस असे तिला अनेकदा सांगितले, परंतु, तिने ऐकले नाही.

https://twitter.com/Raj__Hacker/status/1230701537174835202

सीएए, एनआरसी आणि एनपीआरच्या विरोधात आयोजित कार्यक्रमाच्या आयोजकांची धावपळ उडाली, जेव्हा कार्यक्रमात सहभागी झालेल्या अमूल्या नावाच्या महिलेने पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या. या दरम्यान एआयएमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी सुद्धा हजर होते. त्यांनी ताबडतोब महिलेच्या या वक्व्यावर आक्षेप घेत म्हटले की, मी याच्याशी सहमत नाही आणि आम्ही भारतासाठी आहोत.

संविधान बचाओ बॅनरखाली एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आयोजकांनी जेव्हा अमूल्याला मंचावर भाषणासाठी बोलावले तेव्हा तिने लोकांना आवाहन केले की, त्यांनी तिच्यासोबत पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा द्याव्यात. या दरम्यान व्यासपीठावर ओवैसीसुद्धा हजर होते. अमूल्याच्या या वक्तव्यानंतर ओवैसी यांनी ताबडतोब तिच्या हातातून माईक हिसकावला, तसेच अन्य लोकांना त्यांनी व्यासपीठावरून खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. यानंतरही ती घोषणा देतच राहिली. नंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून तिला व्यासपीठावरून खाली आणले.

तिला व्यासपीठावरून खाली उतरवल्यानंतर ओवैसी म्हणाले, माझा आणि माझ्या पक्षाचा या महिलेशी काहीही संबंध नाही. आम्ही या कृत्याचा निषेध करतो. आयोजकांनी तिला आमंत्रित करणे चुकीचे होते. जर मला माहित असते की असे काही होणार आहे तर मी आलो नसतो. आम्ही भारतासाठी आहोत आणि आपल्या शत्रू राष्ट्राचे कधीही समर्थन करणार नाही. आमचा उद्देश देश वाचवणे आहे.