नांदेडात तब्बल १७ लाख रुपयांचा गुटखा जप्त

नांदेड : पोलीसनामा आॅनलाइन (माधव मेकेवाड) रविवारी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धडक कारवाई करीत वाजेगांव परिसरात एका गुटखा अड्डयावर धाड मारत १७ लाख २० हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रशासनाच्या या कारवाईने गुटखा विक्रेत्यामध्ये खळबळ उडाली असून या व्यवहाराची संपूर्ण साखळी उघडकीस आणण्याचे प्रशासनापुढे आव्हान आहे.

राज्यात गुटखाबंदीच्या निर्णयानंतरही सर्रासपणे गुटखा विक्री केला जातो.  शहर व जिल्ह्यात प्रत्येक पानटपरीवर गुटखा अगदी सहजपणे मिळतो. गुटखाबंदीच्या निर्णयानंतर त्याच्या किमती मात्र वाढविण्यात आल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात शेजारील तेलंगणातून मोठ्या प्रमाणात गुटखा आयात करण्यात येतो.

दररोज गुटख्याचे ट्रक छुप्या मार्गाने नांदेडात दाखल होतात. त्यामध्ये सीमावर्ती भागातील काहींच्या मेहरनजर मुळे गुटखा बंदीची अंमलबजावणी करण्यास अडथळा निर्माण होत आहे. दरम्यान, रविवारी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी प्रविण काळे यांना वाजेगांव परिसरात एका गोदामात गुटखा असल्याची खबऱ्याकडून माहिती मिळाली होती.

त्यानंतर ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक घाटे व त्यांच्या कर्मचाऱ्याच्या मदतीने दुपारी दिल्ली ट्रान्सपोर्ट या गोदामावर छापा मारण्यात आला. मिर्झा महेबुब बेग मिर्झा मोहसिन बेग यांच्या मालकीचे हे गोदाम आहे. गोदामात युके-३३०० या ब्रॅन्डचा तब्बल १७ लाख २० हजार रुपयांचा गुटखा आढळला. ६० बॉक्समध्ये हा गुटखा ठेवण्यात आला होता.