जप्त केलेले ट्रक वाळू माफियांनी पळवून नेले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे-सोलापूर महामार्गावरील शेवाळवाडी येथे अवैध वाळू वाहतूक करताना कारवाईत मिळून आलेले चार ट्रक महसूल पथकाने जप्त करून पुढील कारवाईसाठी हवेली उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर लावले होते. ते चारही ट्रक वाळूमाफियांनी पळवून नेले आहेत.

याप्रकरणी हडपसरचे मंडल अधिकारी व्यंकटेश रामचंद्र चिरमुल्ला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोरेगाव पार्क पोलिसांनी चोरट्यांविरोधात चार ट्रकसहित त्यामध्ये असलेली १६ ब्रास वाळू असा एकूण १२ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करून नेला असल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

महसूल विभागाचे पथक पुणे – सोलापूर महामार्गावर शेवाळवाडी येथील रुकारी पेट्रोलपंपासमोर थांबले होते. या वेळी करण्यात आलेल्या कारवाईत प्रत्येकी ४ ब्रास वाळू भरलेले ४ ट्रक मिळून आले. चारही वाहन चालकांकडे वाहतूक परवाना, ट्रकची व अन्य कागदपत्रे नव्हती. त्यांना शासकीय नियमानुसार प्रतिट्रक अंंदाजे ३ लाख रुपये दंंड भरण्यासाठी सांगितले, त्यास त्यांनी नकार दिला. म्हणून महसूल पथकाने कायदेशीर कारवाई करून चारही वाहनांचा पंचनामा करून ते जप्त केले. जप्त केलेले ४ हे ट्रक निलगिरी बंगला, क्वीन्स गार्डन, पुणे येथील हवेली उपविभागीय अधिकारी कार्यालयात जमा करण्यासाठी नेत असताना यापैकी तीन ट्रकवरील चालक पळून गेले. महसूल पथकाने ओळखीचे चालक बोलावून ही वाहने जमा केली व सदर माहिती हवेली तहसीलदार सुनील कोळी यांना दिली. १० जुलै रोजी तहसीलदार यांना सदर वाहने जागेवर आढळून आली नाहीत. ही वाहने रात्री पळवून नेली असल्याचे लक्षात आले.

You might also like