Serum चे सीईओ अदर पूनावालांचे ट्विट, म्हणाले – ‘लवकरच भारतात परतणार, Covishield चे उत्पादन वेगाने सुरु’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अशात कोरोनावरील लस हा उपाय असल्याचे म्हटले जात आहे. सध्या देशात सीरम आणि भारत बायोटेकच्या लसींचे उत्पादन करत आहेत. त्यातच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आपल्या कोविशिल्ड लसीचे उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न करत आहे. दरम्यान सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी ट्विट करून लवकरच आपण भारतात परतणार असल्याचे सांगितले आहे. तसेच पुण्याच्या प्रकल्पातील कोविशिल्डचे उत्पादन वेगान सुरु आहे. भारतात परतल्यानंतर कोविशिल्ड लसीच्या उत्पादनाची समीक्षा करणार असल्याचे पुनावालांनी नमूद केले आहे.

अदर पुनावाला हे काही दिवसांपूर्वी लंडनला गेल्याचे वृत्त समोर आले होते. तिथे दिलेल्या एका मुलाखतीत धक्कादायक वक्तव्य करत आपल्याला धमक्या मिळत असल्याचे म्हटले होते. मला अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्याचे, बड्या उद्योगपतींचे व अन्य लोकांचे दूरध्वनी येत आहेत. सर्वांनाच कोविशिल्ड लस त्वरित हवी आहे. प्रत्येकाच्या या लसीबद्दलच्या अपेक्षा वाढल्या आहेत. तिचा पुरवठा लवकर व्हावा यासाठी फोन करणारे माझ्याशी आक्रमक सूरात बोलत असतात. मात्र या सर्वांनी दिलेला प्रतिसाद हा अभूतपूर्व असल्याचे पुनावाला यांनी म्हटले आहे. दरम्यान अदर पूनावाला यांना देण्यात येणा-या धमक्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने नुकतीच त्यांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे. पूनावाला यांच्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफवर सोपवली आहे.