Serum Institute ला लसीचे उत्पादन वाढवण्यासाठी 3 हजार कोटींची गरज – अदर पूनावाला

पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात कोरोनाचा पुन्हा संसर्ग वाढत असून काही राज्यातील परिस्थिती चिंताजनक होत आहे. त्यामुळे लसीकरण मोहीमेचा वेग वाढविण्याची मागणी होत आहे. अशा परिस्थिती मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध असणे महत्वाचे आहे. दरम्यान कोविशिल्ड लसीचे उत्पादन करणा-या सीरम इन्स्टीट्यूटला आपल्या लसींचे उत्पादन वाढवण्यासाठी 3 हजार कोटी रूपयांची गरज असल्याची माहिती सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी दिली आहे.

अदर पुनावाला यांनी एका वृत्तवाहिनीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान यावर भाष्यं केले आहे. पुनावाला यांनी म्हटले आहे की, यापूर्वी आम्ही परवडणाऱ्या दरात सुरूवातीला 100 दशलक्ष डोस देण्यास तयार होतो. कंपनीला आताच्या तुलनेत मोठा नफा कमवायला हवा होता. जेणेकरून ती रक्कम उत्पादन आणि सुविधांसाठी पुन्हा गुंतवता आली असती. तसेच अधिक डोसही उपलब्ध करता आले असते. आम्ही भारतीय बाजारपेठेत ही लस जवळपास 150 ते 160 रुपयांत पुरवठा करत आहोत. ही लस तयार करण्याचा खर्च हा जवळपास 20 डॉलर्स म्हणजेच 1500 रुपये आहे. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या म्हणण्यानुसार कमी दरात ही लस उपलब्ध करून देत आहोत, असे नाही की आम्ही नफा कमवत नाही. परंतु आम्हाला अधिक नफा होत नाही जो पुन्हा गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने महत्वाचा असल्याचे पुनावाला यांनी म्हटले आहे.