Serum चे CEO पुनावालांनी पत्रक जाहीर करत मांडली बाजू; म्हणाले – ‘रातोरात नाही बनत व्हॅक्सीन, 11 कोटी डोससाठी 1732 कोटींची मिळालीय ऑर्डर’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  गेल्या दोन दिवसांपासून केंद्र सरकारने ऑर्डर न दिल्याने लस निर्मिती मंदावल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र या बातम्यांचे खंडन करत सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावलांनी पत्रक काढून आपली बाजू मांडली आहे. आम्हाला सरकारकडून सर्वोतोपरी मदत मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेण्यात आल्याने स्पष्टीकरण देत आहे. लस निर्मिती एक प्रक्रिया असून एका रात्रीत उत्पादन वाढवणे शक्य नाही, हे आपल्याला समजले पाहिजे. भारताची लोकसंख्या खूप मोठी आहे. सर्वांसाठी पुरेसे ड़ोस तयार करणे सोपे नाही. अगदी विकसित देशातील कंपन्याही संघर्ष करत असल्याचे पुनावला यांनी पत्रकात नमूद केले आहे.

ट्विटरवर टाकलेल्या पत्रात पुनावाला यांनी म्हटले आहे की, गेल्या वर्षी एप्रिल महिन्यांपासून आम्ही सरकारसोबत काम करत असून आम्हाला सर्वोतोपरी मदत मिळत आहे. शास्त्रज्ञ, नियोजन आणि आर्थिक पातळीवर सहकार्य मिळत आहे. आतापर्यंत आम्हाला 26 कोटींहून अधिक डोससाठी ऑर्डर्स देण्यात आले होते. त्यापैकी 15 कोटीहून अधिक डोस आम्ही पुरविले आहेत. तर पुढच्या 11 कोटी डोससाठी आम्हाला 100 टक्के आगाऊ रक्कमदेखील (1732.50 कोटी) मिळाली आहे. त्यामुळे लवकरच राज्य आणि खासगी रुग्णालयांना डोस पुरविले जातील. प्रत्येकाला लस मिळावी असे वाटत आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. आम्ही ती मागणी पूर्ण करू आणि कोरोनाविरुद्धचा लढा लढू, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. दरम्यान पुनावालांनी नुकतेच एका मुलाखतीत धमकवणारे फोन येत असल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. सध्याच्या परिस्थितीला कोणाला जबाबदार ठरवता येईल. यासंदर्भात मी कोणाच नाव घेतल किवा उत्तर दिले तर माझा शिरच्छेद होईल, अशी भिती त्यांनी व्यक्त केली आहे.