मोबाईल चिपकू तरुणीला मोबाईल प्रेम पडले महागात

बीजिंग : वृत्तसंस्था – सतत मोबाईल वापरणे  हे आरोग्याकरिता हानिकारक असते असे अनेकदा सांगण्यात येते. मात्र सध्याची पिढी  इतकी मोबाईलच्या आधीन झाली आहे की, मोबाईल शिवाय जगणे सध्याच्या पिढीला मुश्किल झाले आहे. पण चीनमधल्या बीजिंग शहरातील एका तरुणीला ही मोबाईलची सवयचांगलीच अंगलट आली आहे. चीनमधील नान  प्रांतातील चंगासायेथे राहणारी ही तरुणी आहे.
ही तरुणी सातत्याने मोबाईल फोनचा वापर करायची सलग सात दिवस तिने सातत्याने मोबाईल वापरला.  मोबाईलच्या अत्याधिक वापरामुळे तिची बोटे आखडली आणि काही केल्या ती सरळ होत नव्हती. सतत फोन धरून तिच्या उजव्या हाताच्या बोटांची विचित्र अवस्था झाली.
रात्रंदिवस ही तरुणी कुणाशी आणि काय बोलत होती हे समजण्यास मार्ग नसला तरी मोबाईलच्या  या अतिरेकामुळे तिची भलतीच चमत्कारिक अवस्था झाली. ती सात दिवसांच्या सुट्टीवर होती आणि या सुट्टीचा तिने असा ‘सदुपयोग’ केला.  नातेवाईकांमध्ये मिसळणे किंवा कुठे सहलीला जाणे यापेक्षा ती सतत मित्र-मैत्रिणींशी फोनवरून गप्पा मारत राहिली.
केवळ काही तासांच्या झोपेवेळी ती फोन खाली ठेवत असे. फोन बराच महागडा असल्याने जागेपणीही ती फोनवर बोलत नसतानासुद्धा तो हातात पकडून ठेवत असे. याचा जो परिणाम व्हायचा तो झाला आणि तिच्या हातात वेदना सुरू झाल्या. आपली बोटे सरळ होत नाहीत हे तिच्या लक्षात आल्यावर तिने हॉस्पिटल गाठले. आता डॉक्टरांच्या उपचारानंतर तिची बोटे सामान्य स्थितीत आली आहेत. मात्र, ही घटना अनेकांसाठी धोक्याचा इशारा देणारीच आहे.