‘शबनम’ला फाशी झाली तर जेलमध्ये जन्मलेल्या तिच्या मुलाचे काय होणार ?

लखनऊ : पोलीसनामा ऑनलाइन – उत्तर प्रदेशातील अमरोहाच्या गावात 7 लोकांच्या हत्येतील दोषी शबनमच्या फाशीची तयारी मथुरा जेलमध्ये जोरात सुरू असतानाच तिच्या छोट्या मुलाने पुन्हा एकदा भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दयेची विनंती करत आपल्या आईला जीवदान देण्यासाठी अर्ज केला आहे. 2008 च्या निर्घृण हत्याकांडात शबनमने तिच्या प्रियकरासोबत मिळून आपल्याच कुटुंबातील सदस्यांची कुर्‍हाडीने हत्या केली होती. हत्याकांडानंतर जेलमध्ये गेलेल्या शबनमने डिसेंबर 2008 मध्ये जेलमध्येच एका मुलाला जन्म दिला होता, ज्याचे नाव ताज ठेवण्यात आले होते.

स्वतंत्र भारतात शबनम पहिली महिला असेल, जिला फाशी दिली जाणार आहे. याबाबत अनेक चर्चा सुरू असताना विविध प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहेत की, शबनमच्या 12 वर्षाच्या मुलाचे काय होणार? त्याचे पालनपोषण आणि शिक्षण कसे होणार? बालपणी अनेक वर्ष आईसोबत राहणारा ताज आता कुठे आणि भविष्यात कसा असेल?

शबनमच्या मुलाचे काय झाले?
2008 पासूनच जेलमध्ये बंद असलेली शबनम आणि सलीमला 2010 मध्ये न्यायालयाने मृत्यूदंडांची शिक्षा सुनावली होती. यानंतर पुढील न्यायालयांमध्ये सुनावणी सुरू राहिली आणि शबनम जेलमध्येच राहिली. परंतु, 2015 मध्ये तिचा मुलगा ताजची सुटका झाली होती, कॉलेजमध्ये शबनमचा सहकारी असलेल्या उस्मान सैफी यांनी ताजचे पालनपोषण करण्याची जबाबदारी स्वीकारली आणि त्यास आपल्या सोबत घेऊन गेले.

त्यावेळी अमरोहाच्या बालकल्याण समितीने एक जाहिरात जारी करून म्हटले होते की, जेल मॅन्युअलनुसार कैदी माता आपल्या मुलांना 6 वर्षाच्या वयानंतर सोबत ठेवू शकत नाहीत, यासाठी ताजला दत्तक घेण्यासाठी पालकांचा शोध सुरू आहे. या आवाहनानंतर कॉलेजमध्ये शबनमपेक्षा दोन वर्षांनी ज्यूनियर असलेले सैफी पुढे आले होते.

सैफी यांनी सांगितले होते की, कॉलेजच्या दिवसात ते पैसा, आरोग्य आणि शिक्षणाच्या बाबतीत कमजोर होते आणि तेव्हा शबनमने त्यांना मदत केली होती. कॉलेजची फी सुद्धा भरली होती, इतकेच नव्हे ती कॉलेजमध्ये नेहमी त्यांच्यासोबत उभी राहात होती. सैफी यांनी शबनमला आपल्या मोठ्या बहिणीचा दर्जा देत म्हटले होते की, शिक्षणानंतर दोघांची लिंक तुटली होती आणि नंतर हत्याकांडाची बातमी ऐकून ते खुप दु:खी झाले होते.

बुलंदशहरात व्यवसायाने पत्रकार असलेल्या सैफी यांनी सांगितले की, त्यांनी आपल्या पत्नीसोबत शबनमची जेलमध्ये भेट घेतली होती आणि शबनमने आपला मुलगा ताजला सोपवून विनंती केली होती. तिने सांगितले होते, ताजला कधीही शबनमच्या गावात घेऊन जाऊ नये आणि त्याचे नाव बदलून त्याचा सांभाळ करावा.

आई प्रेम करत होती, पैसे देत होती!
तेव्हापासून सैफी हेच ताजचे पालनपोषण करत आहेत. ताज मागील सुमारे सहा वर्षात अनेकदा आपल्या आईला भेटण्यासाठी जेलमध्ये जात होता. ताज आठवण काढून म्हणतो की, त्याची आई शबनम त्याला प्रत्येकवेळी प्रेम करत होती, जवळ घेत होती आणि प्रत्येकवेळी जेलमध्ये भेटल्यानंतर पैसे देत होती.

आता शबनमची फाशी जवळ आली असताना तिच्या मुलाने आईला जीवदान देण्यासाठी राष्ट्रपतींकडे अर्ज केला आहे. ताजचे पालक बनलेले सैफी यांनी सुद्धा राष्ट्रपतींना विनंती केली आहे की, ताजचे मातृछत्र हिरावून घेऊ नये.

काय असेल ताजचे भविष्य?
सैफी यांच्यासोबत बुलंदशहरातील सुशांत विहार परिसरात राहणारा ताज सध्या शहरातील एका प्रतिष्ठित शाळेत शिकत आहे. सैफी यांच्यानुसार, ताजचे पालन पोषण चांगल्याप्रकारे केले जात आहे. सैफी यांचे असेही म्हणणे आहे की, शबनमने आपली मोठी प्रॉपर्टी जर शाळा, कॉलेज, हॉस्पिटलसारख्या कामासाठी दान केली तर चांगले होईल.

सध्या, एक बाजू अशीही आहे की, शबनमने कोणतीही कागदोपत्री कार्यवाही केली नाही तर तिची वारसा हक्काची प्रॉपर्टी तिच्या मुलास भविष्यात मिळू शकते आणि जर शबनमने एखादे मृत्यूपत्र किंवा चॅरिटीसाठी इच्छापत्र केले तर ताजचे भविष्य सैफी यांच्यावरच अवलंबून असेल. ताजच्या पालनपोषणाबाबत नियमानुसार जिल्हा बालकल्याण समिती वेळोवेळी देखरेख करत आहे.