PM नरेंद्र मोदींपाठोपाठ शरद पवारांनी देखील टोचून घेतली ‘कोरोना’ची लस (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन : देशभरात 60 वर्षावरील नागरिकांना कोरोनाची लस देण्याच्या मोहिमेला सोमवार (दि. 1) प्रारंभ झाला आहे. त्याअंतर्गत आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात लस टोचून घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही आजच मुंबईत जे.जे. रुग्णालयात कोरोनाची लस टोचून घेतली आहे. दरम्यान कोरोना प्रतिबंधक लस घेणारे शरद पवार हे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते ठरले आहेत.

जे. जे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर शरद पवार यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर पवारांना भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन लस देण्यात आली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. तसेच जे.जे.रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने देखील पवारांसोबत उपस्थित होते. देशात आजपासून 60 वर्षांवरील आणि गंभीर आजारांशी लढा देणाऱ्या 45 वर्षांवरील वयोगटातील लोकांना कोरोनाची लस दिली जात आहे.