शरद पवारांना Gallbladder चं दुखणं; पण ते नेमकं आहे तरी काय? कशामुळे होतो? जाणून घ्या…

पोलिसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना पोटात दुखत असल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात रविवारी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती देण्यात आली. शरद पवारांच्या पित्ताशयावर बुधवारी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. 31 मार्चला एण्डोस्कोपी झाल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार असे सांगण्यात आले. मात्र, Gallbladder चे दुखणे नेमकं आहे तरी काय? ते कशामुळे उद्भवते यासर्वाची माहिती घेणार आहोत…

व्यायामाचा अभाव, आनुवंशिकता, अतिरिक्त वजनवाढ, पित्ताशयाच्या पिशवीतील दोष, बैठी जीवनशैली या कारणांमुळे Gallbladder हा आजार जडतो.

अशी आहेत याची लक्षणे…

– पोटाच्या वरच्या भागात सुरुवातीला थोडेसे उजवीकडे दुखायला लागते.

– पित्ताशयातील खड्यांमुळे स्वादुपिंडदाह (पॅनक्रियाटायटिस) हा गंभीर विकार होऊ शकतो.

– जेवल्यावर पोटात गुबारा धरतो, वारंवार गॅसेस होतात, मळमळ सुटते, छातीत जळजळ होऊ लागते.

– एखादा खडा पित्तनलिकेत अडकून राहिला तर पित्तरस आतडयात नेणारा मार्ग बंद होतो आणि पित्तरस यकृतामध्ये साचू लागतो. पित्तरसातील बिलिरुबीन हे रंगद्रव्य रक्तात मिसळू लागते आणि काविळीची लक्षणे दिसू लागतात.

– या अशा काविळीला अवरोधक कावीळ (ऑबस्ट्क्र्टिव्ह जॉण्डिस) म्हणतात. यामध्ये पोटात कमालीचे दुखते. हे दुखणे अनेकदा पोटातील मध्यभागातून आतल्या बाजूने पाठीकडे जाते. शिवाय अंगाला खाज सुटते.

कोणाला होऊ शकतो हा त्रास…

– वैद्यकशास्त्रामध्ये पित्ताशयातील खडे हे फॅट, फर्टाइल, फीमेल ऑफ फोर्टी म्हणजे स्थूल देहाच्या चाळिशीतील महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळते.

– पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये याचे प्रमाण सहापटींनी जास्त असते. व्यायामाचा अभाव, अतिस्थूलपणा, स्थूल शरीर, जाडेपणा, अति तूपकट, त्यांचा आहार, तेलकट खाणे, आहारात तंतुमय पदार्थ न घेणे, बैठी कामे करणे, वरचेवर फास्ट फूड किंवा जंक फूड असणे, या सर्व गोष्टींमुळे पित्ताशयात खडे तयार होऊ शकतात.

असे होते पित्ताशयातील खड्याचे निदान…

काही विशिष्ट रक्त तपासणी, एण्डोस्कोपी व सोनोग्राफी करून पित्ताशयातील दोष, पित्तनलिकेचा आजार, अडकलेले खडे याची पूर्ण माहिती मिळू शकते.

असे आहेत यावरील उपाय…

– एखाद्यास पित्ताशयाच्या खड्यामुळे त्रास होत असेल आणि कावीळ नसेल तर शस्त्रक्रिया करून हे पित्ताशय काढून टाकता येते, ही शस्त्रक्रिया पोटाची चिरफाड न करता दुर्बिणीद्वारे लॅप्रोस्कोपी (Laparoscopy) केली जाते. ती तज्ज्ञ, अनुभवी सर्जनकडून करणे. त्यामुळे रुग्ण दुसऱ्या दिवशी घरी जाऊ शकतो.

– जर एखाद्यास पित्ताशयाच्या खड्यामुळे कावीळ असेल तर दुर्बिणीद्वारे लॅप्रोस्कोपी किंवा ERCP करून, पित्तनलिकेतील खडे काढले जातात. दुर्बिणीद्वारे एक छोटेसे छेद करून पित्तनलिकेतील खडे काढता येतात व एक प्लास्टिकची नळी (stent) पित्तनलिकेत टाकून कावीळ कमी होते. पुन्हा होऊ नये म्हणून दुर्बिणीद्वारे पित्ताशय काढणे उचित ठरते. काही रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज लागते ज्यामध्ये पित्तनलिका ही लहान आतड्यास जोडली जाते.

– दुर्बिणीद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेमुळे फारशी गुंतागुंत निर्माण होत नाही व पोटावर टाके, जखमेत व्रण राहत नाही. ही शस्त्रक्रिया सोपी, सुलभ असते. यामध्ये खराब झालेले पित्ताशय व खडे काढून टाकतात. यानंतर त्या व्यक्तीला त्रास होत नाही. कारण पचनास लागणारा पित्तरस सरळ लहान आतड्यात नियमित प्रमाणात येत राहतो.

हे होऊ नये म्हणून अशी घ्या काळजी…

– जेवणात रोज सॅलेड किंवा कोशिंबीर घ्यावे.

– चिकू, सफरचंद, पपई, संत्री, मोसंबी, केळे अशी फळे खावीत.

– जेवणातील तेल-तुपाचे प्रमाण (स्वयंपाकातील) योग्य प्रमाणात असावे म्हणजे फोडणीसाठी माफक तेल, भातावर थोडे साजूक तूप (हे लोणी काढून घरी बनवलेले तूपच असावे) इतके चालेल. पनीर, खोबरे व शेंगदाण्याचाही वापर माफक प्रमाणात करावा.

– तळलेले पदार्थ, फास्ट फूड वरचेवर खाऊ नये.

– रोज नियमित व्यायाम करावा. रोज एक तास चालायला जावे.

औषधे काय असतील ?

– पित्ताशयातील खडे विरघळण्याची काही औषधे उपलब्ध आहेत पण ती बरीच वर्षे घ्यायला लागतात.

– ही औषधे बरीच खर्चिक असतात व खडे विरघळण्याचे प्रमाण अनिश्चित असते. दुसरा धोका म्हणजे या अवधीत एखादा खडा अडकून काही दुष्परिणाम होणार नाहीत, असे सांगता येत नाही.

खडे असल्याने ते काढणे गरजेचे नाही

– पित्ताशयातील खडे असणाऱ्या 70-80 टक्के रुग्णांना त्याचा काही त्रास होत नाही. त्यातील काही सोनोग्राफीमध्ये दिसतात. अशा खड्यांना सायलेंट खडे म्हणतात. जर खड्यांचा काही त्रास नसेल, ते लहान असतील व पित्ताशय जाड झाले नसेल तर असे खडे काढणे आवश्यक नसते. पण डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा आणि त्या सल्ल्यानेच शस्त्रक्रियाही गरजेची असल्यास करावी.