मराठा महासंघाचे नेते शशिकांत पवार हे मराठा समाजात फूट पाडताहेत : आमदार शशिकांत शिंदे

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन –  खासदार छत्रपती उदयनराजे भोसले व मराठा महासंघाचे नेते अ‍ॅड. शशिकांत पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत मराठा आरक्षणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. त्यावर आता आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde )यांनी पत्रकाद्वारे प्रत्युत्तर दिले आहे. शशिकांत पवार हे मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप शशिकांत शिंदे (Shashikant Shinde)यांनी केला आहे.

शशिकांत शिंदे यांनी पत्रकात म्हटले की, (कै.) अण्णासाहेब पाटील यांनी मराठा महासंघाच्या माध्यमातून मोठे आंदोलन केले. त्यांनी पहिल्यांदा मराठा समाजाला एकत्र आणले. १९८२ मध्ये मराठा आरक्षणाची बीजे रोवली. या आंदोलनात अ‍ॅड. शशिकांत पवार हेही सहभागी होते. अण्णासाहेब पाटील यांच्या निधनानंतर नेतृत्व एवढे सक्षम होते, तर मराठा महासंघ पुढे ताकदीने का चालवू शकला नाही, याचे उत्तर पवार यांनी द्यावे. मंडल आयोगाची चर्चा करताना २० वर्षांपासून या विषयावर तुम्ही एक चकार शब्द काढला नाही. तुम्ही शरद पवार यांच्याकडे सतत येत होता, भेटत होता. तेव्हा शरद पवार यांच्यापुढे तुम्ही का तक्रारी मांडल्या नाहीत, असा सवाल शिंदे यांनी विचारला.

मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सगळे नेते बाजूला झाले. सामान्य कार्यकर्त्यांनी नेतृत्व करून देशाला दिशा दाखवणारे आंदोलन केले. नेतृत्वाविना हे आंदोलन शांततेत करण्याचा इतिहास घडला व सरकारवर दबाव वाढला. आता या प्रश्नावर वेगवगेळी भूमिका मांडून शशिकांत पवार हे मराठा समाजात फूट पडण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप शिंदे यांनी केला.

‘स्ट्रॉंग मराठा’ नेत्याला लक्ष करण्याचा प्रयत्न

मराठा आरक्षणप्रश्नी शशिकांत पवार यांनी कधीही परखड भूमिका घेतली नाही. मात्र, त्यांनी उदयनराजेंना सोबत घेऊन त्यांच्या नावाचा वापर करत मराठा आंदोलनाचा व मंडल आयोगाचा आधार घेत ‘बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला…’ असे आव्हान देण्याचा प्रयत्न केला. तो पूर्णपणे चुकीचा आहे.

‘त्यांचा बोलविता धनी दुसराच कोणतरी आहे. स्ट्रॉंग मराठा’ नेत्याला लक्ष करण्याचा प्रयत्न ते कोणाच्या तरी सांगण्यावरून करत आहे. हे सर्व होताना मराठा समाजातील कार्यकर्त्यांच्या ताकदीवर सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडू. मराठा समाजाच्या या ताकदीचा अ‍ॅड. शशिकांत पवार यांनी फायदा घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये, असेही शिंदे यांनी खडसावले आहे.