एनआरआय महिलेला लग्नाचा वाढदिवस साजरा करणे पडले महागात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लग्नाचा वाढदिवस साजरा करणे एनआरआय महिलेला महागात पडले. या महिलेने केक कापण्यासाठी वेटरकडे सुरी मागितली. संतापलेल्या वेटरने सुरीने महिलेवर हल्ला करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार आंधेरी येथील जे.बी. नगर परिसरातील हॉटेलमध्ये घडला. याप्रकरणी पोलिसांनी निशांत गौडा (वय-२३) या वेटरला अटक केली आहे. फरझाना मीरत (वय-३०) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फरझाना मीरत ही महिला रविवारी सकाळी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आली. ती गुजरात येथे लग्नासाठी जाणार होती. रविवारी ती आईसोबत जे. बी. नगर येथील हॉटेलमध्ये गेली होती. मीरतच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने तिने वेगवेगळया खाद्य पदार्थांसह केकचीही ऑर्डर दिली होती. त्यासाठी तिने सहा ते सातवेळा वेटरला बोलावले.

निशांत गौडा ऑर्डरप्रमाणे केक घेऊन आला. मात्र, त्याने सुरी आणली नाही. त्यामुळे तिने त्याल पुन्हा सुरी आणण्यासाठी पाठवले. फरझानाची सुरी आणायला सांगण्याची जी पद्धत होती त्यावर निशांत प्रचंड संतापला होता. तो काही न बोलता गपचूप निघून गेला. सुरी घेऊन आल्यानंतर ती फरझानाच्या हातात देण्याऐवजी त्याने त्याच सुरीने तिच्यावर वार केला. यामध्ये फरझानाच्या गळयाला जखम झाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी फरझाना मीरत आणि तिच्या आईचा जबाब नोंदवून घेतला आहे.