शीतल पवार खून प्रकरण : तीन वर्षांनंतरही दोषारोपपत्र दाखल नाही

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – शीतल पवार खून प्रकरणी पोलिस अतिशय धिम्यागतीने तपास करत असल्याने शीतलच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. खून होऊन तीन वर्षे उलटले तरी पोलिसांनी अजूनही दोषारोपपत्र दाखल केले नसल्याचे त्यांनी सुनावणीवेळी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. के. के. सोनवणे यांच्या खंडपीठाने शासनासह पोलीस प्रशासनाला याप्रकरणी नोटीस बजावली आहे. आता १९ डिसेंबर रोजी याचिकेवर सुनावणी होणार आहे.

या प्रकरणाची माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील ब्रम्हगाव येथील शीतल मारुती पवार (१५) हिचा ३ सप्टेंबर २०१५ रोजी खून झाला होता. तिच्या वडिलांनी घटनेच्या दुसऱ्या दिवशी आष्टी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्याआधारे पोलिसांनी गुन्हाही नोंदविला. पण अद्याप शीतलच्या मारेकऱ्यांचा शोध लागलेला नाही. या प्रकरणाचे अद्याप दोषारोपपत्रही पोलिसांनी न्यायालयात अद्याप दाखल केलेले नाही.

मारुती पवार यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडे आरोपीच्या शोधासाठी पाठपुरावा केला. मात्र त्यांच्या पदरी निराशा आली. त्या नाराजीने त्यांनी सदर याचिका दाखल केलेली आहे. याचिकाकत्र्याच्या वतीने ॲड. संदीप राजेभोसले, ॲड. शेख व ॲड. घोंगडे हे काम पाहत आहेत. दरम्यान, पोलीस यंत्रणा तीन वर्षांपासून या खून खटल्यात काहीच कारवाई करत नसल्याने तसेच दोषारोपपत्र दाखल करण्यातही हयगय करत असल्याने या खुनाचा तपास सीआयडी अथवा सीबीआय यांच्याकडे सोपविण्याची विनंती या याचिकेत शीतलच्या वडीलांनी केली आहे.