शिवसेनेकडून ‘नेटफ्लिक्स’च्या विरोधात पोलिसांकडे तक्रार, हिंदूंना आणि भारताला बदनाम केल्याचा आरोप

नवी दिल्ली वृत्तसंस्था – शिवसेनेच्या आयटी सेलचे सदस्य रमेश सोळंकी यांनी नेटफ्लिक्सविरोधात तक्रार दाखल केली आहे. नेटफ्लिक्स ‘हिंदू आणि भारत यांची बदनामी करीत आहे’ असा आरोप त्यांनी केला आहे. एलटी मार्ग पोलिस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल केली आहे.

अमेरिकन कंपनी नेटफ्लिक्स हिंदूंच्या भावना दुखावते आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. सेक्रेड गेम्स, लैला आणि घुल या वेब मालिकेचे उदाहरण देऊन सोळंकी म्हणाले की, या मालिकांनी हिंदू व भारताचे चुकीचे चित्रण केले आहे. या तक्रारीत कॉमेडियन हसन मिनहाजच्या शोचा उल्लेखही आहे.

सोळंकी यांनी आपल्या तक्रारीत म्हंटले आहे की, “नेटफ्लिक्समध्ये भारताच्या बहुतेक प्रत्येक मालिकेत देशाला जागतिक पातळीवर कलंकित केले जाते, येथे हिंदूफोबिया वाढविला जातो आणि या माध्यमातून देशाला चुकीच्या मार्गाने प्रोजेक्ट केले जाते.

रमेश सोळंकी म्हणाले की, त्यांनी अधिकाऱ्यांना या मालिकांमधील माहिती तपासून योग्य ती कार्यवाही करण्याचे आवाहन केले. संपूर्ण टीमला नोटीस पाठवा किंवा त्यांचा परवाना रद्द करा, सोळंकी म्हणाले की हिंदूंना बदनाम करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. त्यांनी आपल्या तक्रारीची एक प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलिस आयुक्तांना दिली आहे.

यापूर्वीही, शिवसेनेने नेटफ्लिक्सवर हिंदू आणि शीखांच्या धार्मिक प्रतीकांचा अनादर केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे.