पंतप्रधान, गृहमंत्री, गायब आहेत, देश रामभरोसे ! अंहकार सोडा, ‘महाराष्ट्र मॉडेल’ लागू करा, संजय राऊतांचा ‘सल्ला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स आणि औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. आरोग्य सुविधा वेळेवर मिळत नसल्याने नातेवाई आणि रुग्णांचे हाल होत असल्याचे पहायला मिळत आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये हीच परिस्थिती आहे. यावरुन अनेकांनी सोशल मीडियातून आपला राग व्यक्त केला आहे. याच दरम्यान शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

प्रभू श्रीरामांच्या आयोध्येत लोक मरत आहेत

संजय राऊत म्हणाले, देशात पंतप्रधान आहेत, केंद्रीय गृहमंत्री आहेत, पण ते गायब आहेत. सध्या देश रामभरोसे चालला आहे. गंगा-यमुना नदीत प्रेत सापडत आहेत. नद्यांमध्ये प्रेतांचा खच दिसून येत आहे. मृतदेहांवर व्यवस्थित अंत्यसंस्कारही करता येत नाहीत. या पूर्वी या देशात असं कधीच झालं नव्हतं. देशात नुसता हाहाकार माजला आहे. प्रभू श्रीरामाच्या आयोध्येत ऑक्सिजन अभावी लोक मरत आहेत. अहंकार आणि राजकारण विसरून जर बोलणी केली तर देश पुढे जाईल. असे सांगतानाच अहंकार बाजूला ठेवून देशात महाराष्ट्र मॉडेल लागू करा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

केंद्राने अहंकार बाजूला ठेवावा

संजय राऊत पुढे म्हणाले, महाराष्ट्रात नेहमीच उत्तम काम झालं आहे. त्यांना बदनाम करण्याचं कामही नेहमीच झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली देशात महाराष्ट्राने उत्तम काम केलं आहे. केंद्र सरकार, पंतप्रधान आणि देशाच्या आरोग्य मंत्र्यांनी कोणताही अहंकार न बाळगता महाराष्ट्र मॉडेल लागू करायला पाहिजे. कोरोनाचा संसर्ग वरखाली होत आहे. मात्र कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचे काम महाराष्ट्राने उत्तम प्रकारे केले आहे. त्याचं कौतुक देशात नाही तर जगभरात सुरु आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

दिल्लीचा नक्शा बदलू काय करणार ?

सेट्रल व्हिस्टा प्रकल्पावर बोलताना संजय राऊत म्हणाले, देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी या संदर्भात पत्रं लिहिलं आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा पैसा कोरोनासाठी वापरण्यात यावा. दिल्लीचा नक्शा बदलून काय करणार ? लोक जगण्यासाठी संघर्ष करत आहेत, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.