शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख दुसऱ्यांदा ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री आणि नेत्यांना कोरोनाची लागण होत आहे. शिवसेनेचे नेते आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यासोबत घरातील इतर चार सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख हे देखील कोरोना बाधित झाले आहेत. विशेष म्हणजे 19 मार्च रोजी यशवंतराव गडाख यांनी कोरोनाची लस घेतली होती. गडाख कुटुंब कोरोना बाधित झाल्याची माहिती त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे. मंत्री शंकरराव गडाख हे दुसऱ्यांदा कोरोना बाधित झाले आहेत.

शंकरराव गडाख यांनी ट्विट करुन माहिती देताना सांगितले की, माझा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे मी गृह विलगीकरणांत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घेऊन तपासणी करुन घ्यावी. सर्वांना माझी विनंती आहे की, शासनाच्या सूचनांचे पालन करावे तसेच आपल्या घरातील सदस्यांची काळजी करावी. मास्क वापरा, नियमित हात धुवा व घराबाहेर पडू नका, असे आवाहन मंत्री गडाख यांनी केले आहे.