भंगारावरून शिवसेना-राष्ट्रवादीत वाहनांची तोडफोड करत राडा; परस्परविरोधी तक्रारी

अलिबाग : पोलीसनामा ऑनलाइन – विळेभागाड एमआयडीसीत पॉस्‍को स्‍टील हि विदेशी कंपनी असून या कंपनीचे भंगार उचलण्याच्या कंत्राटावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात अनेक दिवसापासून वाद आहे. पुन्हा हा वाद उफाळून आला. विळे-कोलाड मार्गावर सुतारवाडी इथं राष्‍ट्रवादीच्‍या कार्यकर्त्‍यांनी कंपनीचा माल घेऊन जाणारे ट्रक अडवून तोडफोड केली. दरम्यान हि माहिती समजताच शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक तेथे पोहोचले असता त्‍यांच्‍याही गाड्या फोडण्‍यात आल्‍या. त्यानंतर शिवसैनिक आणि राष्‍ट्रवादीच्‍या कार्यकर्त्‍यांत तुफान राडा सुरु झाला यावेळी एकमेकांच्‍या गाडया फोडून नुकसान केलं. यामध्ये आमदार भरत गोगावले यांच्‍या गाडीचाही समावेश आहे. त्‍यावेळी या गाडीत गोगावले यांचे पुत्र आणि शिवसेनेचे युवा अधिकारी विकास गोगावले हे होते, अशी माहिती समोर आली आहे.

जिल्‍हा पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत परिसरात दंगल नियंत्रण पथक तैनात केले आहे. या प्रकरणी कोलाड पोलीस ठाण्‍यात परस्‍पर विरोधी गुन्‍हे दाखल करण्‍यात येत आहे.
पॉस्‍को स्‍टील या विदेशी कंपनीने या भंगारासाठी ग्‍लोबल टेंडर काढल्‍याने दोन्‍ही बाजूंकडून संताप व्‍यक्त होत होता. त्‍याविरोधात कंपनीच्‍या प्रवेशव्‍दारावर आंदोलने सुरूच होती.

पॉस्‍को कंपनीच्‍या गेटवरच काही दिवसांपूर्वीच शिवसेना-राष्ट्रवादी कार्यकर्त्‍यांमध्‍ये राडा झाला होता त्‍यावेळी शिवसेनेचे जिल्‍हाप्रुमख अनिल नवगणे यांनाही धक्‍काबुक्‍की झाली होती. वारंवार हा वाद चिघळत असल्याने हा वाद संपवण्यासाठी शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांच्‍या उपस्थितीत विळा येथे या विषयावर बैठक झाली. त्यावेळी हा वाद संपवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र राष्‍ट्रवादीच्‍या कार्यकर्त्‍यांनी मालवाहू – ट्रक फोडल्‍याने हा वाद पुन्‍हा उफाळला आहे. कोलाड पोलीस ठाण्‍यात या प्रकरणी गुन्‍हा दाखल करण्‍याचे काम सुरू आहे.