‘आयएनएक्स’ व ‘एअरसेल’ व्यवहार म्हणजे ‘मिठाचा सत्याग्रह’ किंवा ‘गांधींची दांडीयात्रा’ नव्हे

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – आयएनएक्स मीडिया कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी चार दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. यानंतर शिवसेनेने आपल्या सामना या मुखपत्रातून चिदंबरम यांच्यावर टीका केली आहे. चिदंबरम गृहमंत्री असताना अनेक राजकीय कार्यकर्त्यांचे स्वातंत्र्य याच पद्धतीने हिरावून घेतले होते व त्यासाठी सीबीआयसारख्या संस्थांचा वापर झालाच होता. ‘हिंदू दहशतवाद’ या शब्दाचे जनक तत्कालीन गृहमंत्री चिदंबरमच होते व त्या विकृत कल्पनेचा त्यावेळी बळी ठरलेले अमित शाह, नरेंद्र मोदी हे आज दिल्लीचे सूत्रधार आहेत, असे सामनाच्या अग्रलेखातून म्हटले आहे.

नेमकं काय म्हटलंय सामनाच्या अग्रलेखात –
चिदंबरम त्यांच्या अटकेच्या निमित्ताने दिल्लीत जे नाटय़ ‘सीबीआय’ने घडवले त्याची खरेच आवश्यकता होती का ? उच्च न्यायालयाच्या आवारातून चिदंबरम अदृश्य झाले ते 72 तासांनंतर काँग्रेस मुख्यालयात प्रकट झाले. आपण निर्दोष असल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला. चिदंबरम तेथून स्वतःच्या घरी पोहोचले व सीबीआयने त्यांच्या अटकेसाठी जे नाटय़ केले ते संपूर्ण देशाने पाहिले. चिदंबरम हे 72 तास दिल्लीतच होते, पण सीबीआय त्यांना शोधू शकली नाही.

ज्या तपासयंत्रणा चिदंबरमसारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीला शोधू शकल्या नाहीत त्या यंत्रणा गुन्हेगार किंवा अतिरेक्यांचा कसा शोध घेणार, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. 72 तास चिदंबरम कोठे होते, हे पोलीस किंवा इतर तपासयंत्रणा शोधू शकत नसतील तर ते त्यांचे अपयश म्हणावे लागेल. चिदंबरम हे काँग्रेसचे नेते आहेत, माजी गृहमंत्री, माजी अर्थमंत्री आहेत. असतील हो, पण त्याचा इथे काय संबंध ? ते कोणीही असतील, पण कायद्याच्या वर नाहीत. चिदंबरम यांच्या म्हणण्यानुसार ते आरोपी नसतील तर, आरोपी नसताना अटक करून न्यायला तपासयंत्रणांना वेड लागले आहे काय ? ‘आयएनएक्स’ व ‘एअरसेल’ व्यवहार म्हणजे ‘मिठाचा सत्याग्रह’ किंवा ‘गांधींची दांडीयात्रा’ नव्हे. हा काही स्वातंत्र्यसंग्राम नाही.

‘हिंदू दहशतवाद’ या शब्दाचे जनक तत्कालीन गृहमंत्री चिदंबरमच होते. काँग्रेसचा क्षीण झालेला आवाज काही दिवसांत मूक होईल. लोक चिदंबरम यांना विसरून जातील. अशा प्रकारे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून पी चिदंबरम यांनी त्यांच्या काळात केलेल्या कामांची माहिती देत आताच्या वास्तवात अनेक प्रश्न विचारले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –