शिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या अतिआत्मविश्वसाचा ‘समाचार’ तर शरद पवारांची ‘पाठराखण’

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन – शरद पवारांचे पर्व महाराष्ट्रातून संपले आहे असे विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले होते. या विधानावरून शिवसेनेने मुख्यमंत्र्यांच्या निवडणुकीच्या निकालासंदर्भातच्या  अतिआत्मविश्वसाचा समाचार घेत शरद पवार यांची पाठराखण केली आहे. ‘वेगळे काय घडेल? दाबा बटण!!’ या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने निवडणुकीच्या निकालासंदर्भात बोलताना महाराष्ट्रातील इतर प्रश्नांकडेही लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

लेखातील ठळक मुद्दे –

विधानसभा निवडणुका हा आता केवळ औपचारिकपणाच उरला –
राष्ट्रीय प्रश्नांची एक प्रकारची नशा असते आणि मग इतर विषय गौण ठरतात. राज्यांच्या प्रश्नांवर नंतर केव्हाही बोलता येईल असे सध्या वातावरण आहे. गुंतवणूक, शेती, शिक्षण, उद्योग, आरोग्य अशा क्षेत्रांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राला पुढे नेले असे प्रमाणपत्र अमित शहा यांनी दिले व तेच पुढचे मुख्यमंत्री असे मुंबईत येऊन जाहीर केले. त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका हा आता केवळ औपचारिकपणाच उरला. लोकांनी फक्त बटणच दाबायचे आहे, दुसरे काय?

महाराष्ट्रात आता कोणतेच प्रश्न शिल्लक नाहीत ?
महाराष्ट्रात यावेळी पाऊस चांगला झाला आहे. मराठवाड्यात दुष्काळ आहे. कुठे पूर तर कुठे होरपळ आहे, पण चंद्रकांत पाटील यांनी आत्मविश्वासाने सांगितले की, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील सर्व प्रश्न मार्गी लावले आहेत. महाराष्ट्रात आता कोणतेच प्रश्न शिल्लक नाहीत. असा आत्मविश्वास याआधी कोणत्याही पक्षाने दाखवला नव्हता.

लोकसभा निवडणुकांप्रमाणेच विधानसभेचे निकाल –
निवडणूक व निकाल सर्व कार्यक्रम दिवाळीआधीच संपणार असल्याने मंदीच्या बाजारात फटाके व मिठायांची आवक वाढणार आहे. मतदारांच्या मनात काय आहे व राज्याचे निकाल काय लागतील हे सांगायला आता भविष्यवाल्या पोपटरावांची गरज नाही. लोकसभा निवडणुकांतील निकालांपेक्षा वेगळे काही घडण्याची शक्यता आज तरी दिसत नाही. नवे राज्य, नवे मुख्यमंत्री महाराष्ट्रात 10 नोव्हेंबरनंतर सूत्रे हाती घेतील, पण तो नवा मुख्यमंत्री मीच असेन, दुसरा कोणीही नाही असे श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे जाहीर केले आहे. याचा अर्थ त्यांनी हायकमांडशी यावर चर्चा केली आहे व तसा शब्द घेतला आहे.

शरद पवारांची तडफ वाखाणण्यासारखी –
महाराष्ट्रात विरोधी पक्ष आधीच गर्भगळीत होऊन पडले आहेत. काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादीतील दिग्गज नेते, विद्यमान आमदारांनी भाजपात व शिवसेनेत प्रवेश केला आहे. काँग्रेस अतिदक्षता विभागात आहे तर राष्ट्रवादी लटपटत्या पायांवर उभी आहे. शरद पवार हे महाराष्ट्र पालथा घालीत आहेत, पण उपयोग काय? त्यांची तडफ वाखाणण्यासारखी आहे इतकेच.

लोकांचे प्रश्न सुटले असतील तर युतीला 250 पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात मिळतील –
मुख्यमंत्र्यांनी सांगितले, ‘शरद पवारांचे ‘पर्व’ महाराष्ट्रातून संपले आहे.’ इथे ‘पर्व’ हा शब्द त्यांनी वापरला आहे. जो काही घडवतो, निर्माण करतो त्याचेच ‘पर्व’ असते व पर्व हे कधीतरी संपतच असते. बाकी सर्व ‘माजी’ ठरतात. मुख्यमंत्र्यांनी असाही आरोप केला आहे की, ‘पवारांनी तोडफोडीचे राजकारण केले. त्याची फळे ते भोगत आहेत.’ अर्थात तोडफोडीच्या राजकारणामुळेच सध्या अनेक पक्ष तरारत आहेत हे महाराष्ट्राची जनता पाहत आहे. निवडणुका लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी माणसे तोडून फोडूनच घ्यावी लागतात, हा आजवरचा इतिहास आहे. विचारांच्या पायऱ्या आता ढिल्या पडत आहेत, पण हे सर्व केले तरी लोकांचे प्रश्न सुटायला हवेत. ते खरेच सुटले असतील तर युतीला 250 पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात मिळतील.

काँग्रेसने लोकविरोधी भूमिका घेऊन उरलेसुरले अस्तित्व संपवून टाकले –
370 कलमाच्या बाबतीत काँग्रेसने लोकविरोधी भूमिका घेऊन आपले उरलेसुरले अस्तित्व संपवून टाकले. महाराष्ट्रात विकास, बेरोजगारी, कर्जमाफीतला गोंधळ, पीक विमा योजनेतील त्रुटी या प्रश्नांवर सत्तेत असूनही शिवसेनेने आवाज उठवला. ते मार्गीही लावले. आज त्यावर बोलणारे विरोधक त्यावेळी मात्र गप्प होते. भाजपचे नेते सध्या 370 कलमावर बोलत आहेत आणि लोकही सर्व विसरून ते ऐकत आहेत. त्यामुळे चंद्रकांतदादा म्हणतात त्याप्रमाणे राज्यात प्रश्न उरलेले नाहीत व काँग्रेसने नसलेले प्रश्न उगाच उकरून काढू नयेत.
Visit : Policenama.com