लोकसभा तिकिटासाठी उद्धव ठाकरेंसमोरच आमदारांमध्ये जुंपली 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – यापूर्वी शिवसेनेतील अंतर्गत वाद अनेकदा चव्हाट्यावर आला आहे.आता आगामी लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी मातोश्रीवर बैठका सुरु आहेत. या बैठकीत देखील शिवसेनेचा अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आल्याचे पाहायला मिळाले. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे तिकीट मिळवण्यावरून दोन आमदारांची खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्यासमोरच जुंपली. यानंतर उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करीत वाद मिटवला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाजप-सेना युतीनंतर आता जागावाटपाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जागावाटपावरून झालेल्या अंतर्गत वादामुळे आता शिवसेना पक्षप्रमुखांची गोची होण्याची शक्यता असल्याचे दिसत आहे. गुरुवारी मातोश्रीवर मतदारसंघाची आढावा बैठक सुरु होती. त्यावेळी हिंगोली मतदारसंघाचे आमदार आणि माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी आपण लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे संगीतले. त्यावेळी तेथे असलेल्या नांदेड दक्षिणचे आमदार हेमंत पाटील यांनी हिंगोलीसाठी निवडणूक लढण्याची संधी द्यावी अशी मागणी केली. त्यावेळी मुंदडा यांनी मी वरिष्ठ असून मराठा समाजाचा उमेदवार देण्याचा इतिहास असल्याचे जयप्रकाश मुंदडा यांनी म्हंटले. यावरून मुंदडा आणि पाटील यांच्यातील शाब्दिक वाद हातापायीवर आला. शेवटी उध्दव ठाकरेंनाच मध्यस्थी करून त्यांना शांत करावे लागले.