पंजाबच्या शेतकर्‍यांना खलिस्तानवादी ठरविण्याचा विचार दळभद्री, देशात भाजपा नव्या अराजकाला निमंत्रण देत असल्याचा शिवसेनेचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एखादी गोष्ट आपल्या हातातून निसटला की हिंदुस्थान – पाकिस्तान हा खेळ सुरु करायचा ही त्यांची हातचलाखी ठरलेलीच आहे. जवाहरलाल नेहरु विद्यापीठातही त्यांनी हा खेळ खेळला. पण ते पुरावे बोगस ठरले. आता पंजाबच्या शेतकर्‍यांना देशद्रोही, खलिस्तानवादी ठरवायचे हा विचार दळभद्रीपणाचेच लक्षण आहे, अशा शब्दात शिवसेनेने ‘सामना’ अग्रलेखातून भाजप आणि केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. हा विचार नव्या अराजकाला निमंत्रण देणारा असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

सामना च्या अग्रलेखात म्हटले आहे की, सरदार पटेल हे पोलादी पुरुष होतेच. पोलादी पुरुषाचा अतिभव्य पुतळा नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी गुजरातमध्ये उभा केला. सरदार पटेल यांनी शेतकर्‍यांचे आंदोलन उभे करुन ईस्ट इंडिया कंपनीस जेरीस आणले, पण दिल्लीच्या सीमेवर आणि देशाच्या सीमेवर सध्या जो अंदाधुंद प्रकार सुरु आहे. त्यामुळे पोलादी पुरुषाच्या पुतळ्याच्या डोळ्यांच्या कडाही ओलावल्या असतील. चीने सैन्य भारतीय हद्दीत लडाखमध्ये घुसले आहे. त्याचवेळी पंजाब आणि हरयाणाच्या शेतकर्‍यांना दिल्लीच्या सीमेवर अडवून ठेवण्यात आले आहे. थंडीत त्यांच्यावर पाण्याचा मारा करणे हे अमानुष आहे. तरीही शेतकरी मागे हटायला तयार नाहीत. ते केंद्र सरकारविरोधात, पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात हंगामा करीत आहेत. म्हटल्यावर भाजपाने व केंद्रीय यंत्रणांनी त्यांचे नेहमीचे जंतर मंतर, जादुई हातचलाखीचे प्रयोग सुरु गेले.

हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी शेतकर्‍यांच्या आंदोलनात खलिस्तानवादी घुसले आहेत़. म्हणजेच शेतकर्‍यांच्या आंदोलनात पाकिस्तान झिंदाबाद च्या घोषणा दिल्या़ तशी एक क्लिपच म्हणे जारी केली. भारतीय जनता पक्षाची ही भूमिका देशातले वातावरण चिघळवणारी आहेच, पण नव्या अराजकाला आमंत्रण देणारीदेखील आहे. भारतीय जनता पक्षाची ही भूमिका देशातले वातावरण चिघळवणारी आहेच, पण नव्या अराजकाला निमंत्रण देणारी देखील आहे. जवाहरलाल नेहरु विद्यापीठातही पाकिस्तान झिंदाबाद, स्वातंत्र्य, आजादीच्या नावाने घोषणा दिल्या़ गेल्याचे जे पुरावे समोर आणले गेले ते बोगस ठरले. आपलीच माणसे मेकअप करुन घुसवायची व हे असे प्रकार घडवायचे. त्यामुळे देशाची एकात्मता, शांतता, अखंडता उद्ध्वस्त होत असते.

खलिस्तानचा विषय संपला आहे. त्या अंधारयुगातून बाहेर पडण्यासाठी इंदिरा गांधी, जनरल अरुणकुमार वैद्य यांनी प्राणांचे बलिदान दिले. पण खलिस्तानचा विषय आज भाजपवाले नुसते उकरुन काढत नाहीत तर त्यांना ती ठिणगी टाकून पंजाबात स्वत:चे राजकारण सुरु करायचे आहे. पंजाबच्या शेतकर्‍यांना दंगलीचे गुन्हे दाखल केले आहेत. त्याच वेळी वृद्ध, जर्जर अशा अन्नदात्या शेतकर्‍यांवर काठ्या उगारतानाचे, त्यांना रक्तबंबाळ करतानाचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. हे पाहून सरदार पटेल यांचा भव्य पुतळा अहमदाबादेत खरेच अश्रु ढाळत असेल. तेही ‘सरदारच’ होते. शीख बांधवांनाही ‘सरदार’ म्हणूनच संबोधले जाते. सरदारांवर अन्याय तेव्हाही झाला व आजही होतच आहे. अशा शब्दात ‘सामना’ अग्रलेखातून भाजपावर जोरदार टीका करण्यात आली आहे.