मंत्रिमंडळातील फेरबदलाविषयी एकनाथ शिंदे यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासून राज्याचे राजकारण मोठ्या प्रमाणात ढवळून निघाले आहे. राज्यातील घडामोडींना मोठ्या प्रमाणात वेग आला आहे. राज्यातील मंत्रिमंडळात मोठ्या प्रमाणात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच ‘वर्षा’ हे मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान या घडामोडींचं केंद्र बनले आहे. महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा येथील निवासस्थानी भेट घेतली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तसेच त्यांच्या अगोदर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीसुद्धा उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यानंतर आता शिवसेना नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे तसेच परिवहनमंत्री अनिल परब हेदेखील मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर गेले आहेत. यादरम्यान त्यांनी मंत्रिमंडळ फेरबदलाविषयी थेट भाष्य करणे टाळलं आहे. ‘मी माझ्या नगरविकास मंत्रालयासंदर्भात भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आलो आहे. इतर घडामोडींबाबत मला काहीच कल्पना नाही. मंत्रिमंडळ फेररचनेसंदर्भात सुरू असलेल्या चर्चेबाबत मी माहिती घेतो,’ अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांच्याकडूनदेण्यात आली आहे.

कोणत्या खात्यांमध्ये होणार बदल ?
सरकार समोरील अडचणी वाढल्या असताना गृहखात्याचा कारभार अनिल देशमुख यांच्याकडून काढून दुसऱ्या नेत्याकडे दिला जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसेच इतर कोणत्या खात्यांमध्ये फेरबदल होतात, हे बैठकीनंतरच ठरणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत महाविकास आघाडीमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.