शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीचे प्रयत्न होते, रामदास कदमांचा खुलासा 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अहमदनगरमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीच्या आघाडीबाबत राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. अहमदनगरमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीचे प्रयत्न होते असं त्यांनी सांगितलं आहे. इतकेच नाही तर या आघाडीसाठी मी स्वतः अजित पवार आणि विखे पाटील यांच्याशी बोललो होतो असेही रामदास कदम म्हणाले आहेत.

अहमदनगर महापौर निवडणुकीबाबत रामदास कदम यांना विचारले असता त्यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. कदम म्हणाले की, ” विधानसभा निवडणूक निकाल लागण्याआधी राष्ट्रवादीने भाजपला पाठींबा दिला आहे. आम्ही सत्तेतून बाहेर पडलो तर राष्ट्रवादी जागा घेईल अशी भीती आम्हाला वाटत आहे.”इतकेच नाही तर अहमदनगरच्या महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा राष्ट्रवादी भाजपाबरोबर आहे यावर शिक्कामोर्तब झाले आहे, असेही कदम म्हणाले. शिवाय पुन्हा एकदा भाजपाने राष्ट्रवादीबरोबर युती केली आहे. मात्र राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आहेत, असा आरोप कदम यांनी केला.

पुढे ते असेही म्हणाले की, “अहमदनगर प्रकरणाबाबत मी अजित पवार आणि विखे पाटील यांच्याशी बोललो होतो.”सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत होतो, असेही कदम म्हणाले.

मोठा पक्ष असूनही शिवसेना सत्तेपासून दूर
अहमदनगर महापालिकेच्या महापौरपदाची आज निवडणूक पार पडली.  महापौरपदी भाजपच्या बाबासाहेब वाकळे यांची निवड झाली, तर उपमहापौरपदी भाजपच्याच मालनताई ढोणे विराजमान झाल्या. वाकळे यांचा 37 विरुद्ध 0 असा विजय झाला. अहमदनगर महानगरपालिका निडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. शिवसेनेने मतदानावर बहिष्कार टाकला होता. मोठा पक्ष असूनही शिवसेना अहमदनगर महापालिकेच्या सत्तेपासून दूर राहिली.