पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार : खासदार संजय राऊत

अलिबाग : पोलीसनामा आॅनलाइन – भाजप सरकारने जनतेला दिलेली आश्वासने पाळली नसून जनतेचा भ्रमनिरास केला आहे. त्यामुळे आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकार सत्तेत येणार नाही. एवढेच नव्हे तर महाराष्ट्रातही शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. अलिबाग प्रेस असोसिएशनच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त खा. संजय राऊत यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये झाला. यावेळी राऊत बोलत होते.
राऊत म्हणाले, मोदी सरकार ज्या राम मंदिराचा मुद्दा घेऊन निवडणूक लढले तो मुद्दा ४ वर्षात मागे पडला. पूर्ण बहुमत मिळूनही सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला आहे. आज देशात अनेक प्रश्न भेडसावत आहेत. हे प्रश्न सुटावे म्हणूनच भाजपाला पाशवी बहुमत मिळाले, मात्र भाजपाने ४ वर्षात कोणतीही ठोस कामे केली नाहीत. आगामी निवडणुकीत राम मंदिराचा मुद्दा प्रचारात येऊ नये ही आमची भूमिका आहे. त्यामुळे आम्ही राम मंदिराचा मुद्दा सध्या उचलून धरला आहे. दिल्लीची हवा महाराष्ट्राला कधी मानवली नाही. त्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचाही दाखला दिला. शरद पवार हे महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. ते पंतप्रधान होतील, असे आम्हाला गेल्या ३० वर्षांपासून वाटत होते. पण तसे झाले नाही. आगामी निवडणूकीत त्यांच्या पक्षाचे ६ ते ७ खासदारच निवडून येतील, असे भाकित त्यांनी केले. आगामी लोकसभा निवडणुकीबाबत राऊत म्हणाले, सध्या पाशवी बहुमतावर सत्तेत असलेल्या भाजपाचे संख्याबळ किमान १०० ने घटेल, असा दावाही त्यांनी केला. प्रादेशिक पक्ष एकत्र येणे काही गैर नाही.

नाणार प्रकल्पाबाबत ते म्हणाले, कोकणात प्रकल्प आले पाहिजेत परंतु जनता उध्वस्त होणार असेल तर आमचा विरोध राहिल. नाणारला तेथील जनतेचा विरोध आहे. त्यामुळे आम्ही जनतेच्या सोबत आहोत. जर तेथील जनतेने नाणारला समर्थन दिले तर आमची भूमिका वेगळी असेल. आमचा कोणत्या प्रकल्पाला विरोधी नाही, तर तेथील विस्थापनाला व उद्भवणाऱ्या समस्यांना विरोध आहे. तसेच यावेळी शदर पवारांबद्दल बोलताना राऊत यांनी आदराची भावना व्यक्त केली.