मोदी सरकार गाफील राहिल्याच्या सरसंघचालक भागवतांच्या विधानावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर आपण सगळे काहीसे गाफील झालो. म्हणून दुस-या लाटेचे संकट उभे राहिले आहे. आता तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. पण या लाटेला न घाबरता तिला परत फिरावे लागेल, अशी तयारी आपल्याला करावी लागणार आहे. तसेच विज्ञान आणि सत्याच्या आधारावरच कोरोनाविरोधात लढा दिला पाहिजे या RSS प्रमुख मोहन भागवत यांच्या विधानावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पहिल्या लाटेनंतर आपण गाफील राहिलो हे सर्वांचे म्हणणे आहे. सोनाराने कान टोचले हे बरे झाले असे सांगत त्यांनी यावेळी मोदी सरकारला टोलादेखील लगावला. खासदार संजय राऊत मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दिल्लीतील ऑनलाईन व्याख्यान श्रंखलेमध्ये भागवत कोरोना सद्य:स्थिती आणि या संकटाचा मुकाबला कसा करता येईल यावर बोलत होते. भागवत म्हणाले की, डॉक्टरांनी पहिल्या लाटेनंतर इशारा देऊनही सर्वांनी पुरेशी दक्षता बाळगली नाही. त्यामुळे आजची परिस्थिती निर्माण झाली आहे. आता तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू आहे. पण घाबरण्याचे कारण नाही. वज्राप्रमाणे खंबीर राहून सकारात्मकतेने या संकटाचा मुकाबला करावा लागेल. एकमेकांवर दोषारोप करण्याचा किंवा बोटे दाखविण्याचा हा काळ नाही. दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर ब्रिटनमध्ये वाईट परिस्थिती होती. पण पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्या कार्यालयात एक प्रबोधन वाक्य लिहलेले होते. निराशावादी विचारांना आणि पराभवाच्या शक्यतांना येथे थारा नाही, असा आशय त्यातून व्यक्त होत होता असे भागवत यांनी नमूद केले आहे.