शिवसेना ‘या’ दोन जागेवर भाजपच्या विरुद्ध लढणार

खासदार संजय राऊत यांची घोषणा

पणजी :  वृत्तसंस्था – महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपबरोबर युती केली असली तरी गोव्यात मात्र या दोन्ही पक्षांची युती झालेली नाही . त्यामुळे गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांवर शिवसेना भाजपविरुद्ध लढणार आहे .  अशी घोषणा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे .

पणजी येथील आयोजित पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते . उत्तर गोव्यातून राज्यप्रमुख जितेश कामत तर दक्षिण गोव्यातून उप राज्यप्रमुख राखी प्रभुदेसाई शिवसेनेच्यावतीने निवडणूक लढवणार आहेत . अशी माहिती संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली . गोव्यात लोकसभेबरोबर विधानसभेच्या तीन जागांवर पोटनिवडणुका होणार आहेत. त्यातील मांद्रे विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक शिवसेना लढवणार असून लवकरच उमेदवार जाहीर केला जाईल, असं राऊत म्हणाले.

मागील विधानसभा निवडणुकांवेळी शिवसेनेने सुभाष वेलिंगकर यांच्या गोवा सुरक्षा मंचसोबत युती करून निवडणुका लढवल्या होत्या . यावेळी गोवा सुरक्षा मंचने तिन्ही पोटनिवडणुकांचे उमेदवार जाहीर केले आहेत . असे असले तरी आज किंवा उद्या वेलिंगकर यांच्याशी चर्चा करून सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही राऊत यांनी सांगितलं.