Jalgaon News : 7 वीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या ! धक्क्यानं आई-वडिल चक्कर येऊन कोसळले

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलानं राहत्या घरात दोरीनं गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भूषण कैसास भोई असं या 13 वर्षीय मुलाचं नाव आहे. बुधवारी दुपारी 1 वाजता ब्रुकबॉड कॉलनीत ही घटना घडली. त्यानं आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकलेलं नाही. या घटनेचा धक्का बसल्यानं त्याचे आई-वडिल चक्कर येऊन कोसळले.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास रतन भोई हे पत्नी रत्ना, मुलगा भूषण, (13), विशाल (10), सासरे भीमराव मांगो भोई आणि सासू लक्ष्मीबाई यांच्यासह ब्रुकबॉड कॉलनीत राहतात. महामार्गावर अग्रवाल चौकात त्यांची चहा-नाष्त्याची गाडी आहे. यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. सासऱ्यांनीही याच्या पलीकडेच चार दिवसांपूर्वी रसवंती सुरू केली होती. सासऱ्यांना रत्ना ही एकच मुलगी आहे, त्यांना मुलाग नाहीये. त्यामुळं तेही त्यांच्यासोबत रहात होते.

भूषण हा आजी-आजोबा यांच्या सह बँकेत गेला होता. तेथून आल्यावर ते चहाच्या हातगाडीवर गेले तिथं त्याची आई रत्ना होती. तर वडिल हे नशिराबाद येथे गेले होते. थोडा वेळ थांबल्यानंतर आजी आजोबांना सांगून घराची चावी घेऊन भूषण घरी गेला. दुपारी एक वाजता आजी घरी आली तर दरवाजा आतून बंद होता. आवाज दिला तरी आतून काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळं आजी पुन्हा दुकानावर गेली. तिथं तिनं हे सर्व सांगितलं. त्याच्या वडिलांनाही तो दरवाजा उघडत नसल्याचं कळवण्यात आलं. ते तातडीनं घरी आले. दरवाजा तोडल्यानंतर भूषण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. हा प्रकार पाहून वडिल कैलास आणि आई रत्ना यांना धक्का बसला आणि ते चक्कर येऊन कोसळले.

आजूबाजूच्या लोकांनी भूषणला जवळच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात नेलं. तिथं त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तर अंमलदार तुषार जवरे यांनी रुग्णालयात पचनामा केला.