खळबळजनक ! IPS महिलेची तक्रार, म्हणाल्या – ‘पोलिस महासंचालकांनी गाडीत बसवून लैंगिक छळ केला’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   तामिळनाडूच्या विशेष पोलिस महासंचालकांनी एका महिला आयपीएस अधिका ऱ्याचा लैंगिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी संबधित IPS महिला अधिकाऱ्याने राज्याचे पोलिस महासंचालक जे. के. त्रिपाठी आणि गृहसचिवाकडे तक्रार केल्यानंतर संबधित महासंचालकाची बदली करण्यात आली आहे. तसेच त्यांचा विशेष डिजीपीचा दर्जाही काढून घेतला आहे.

राजेश दास असे तक्रार दाखल केलेल्या विशेष पोलिस महासंचालकाचे नाव आहे. तक्रार दाखल केलेली महिला आयपीएस अधिकारी एका जिल्ह्याची पोलिस अधिक्षक आहे. महिला आयपीएस अधिकाऱ्याची मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यावेळी सुरक्षेची जबाबदारी होती. या दौऱ्या दरम्यान त्या दास यांच्या कारमधून प्रवास करत होत्या. त्या कारमध्ये दास यांनी आपला लैंगक छळ केल्याचा आरोप महिला अधिका-यांनी केला आहे. त्यानंतर त्यांनी पोलिस महासंचालक आणि गृह सचिवाकडे तक्रार केली होती. त्यानंतर विरोधी पक्षानेही संबधित महिला अधिका-याची बाजू घेत कारवाईची मागणी केली होती. डीएमकेचे प्रमुख स्टॅलिन यांनीही कारवाईची मागणी करत दास यांना मुख्यमंत्री पाठिशी घालत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर राज्य सरकारने तातडीने समिती नेमून चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच दास यांची बदलीही केली आहे. गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव एस. के. प्रभाकर यांनी दास यांच्या चौकशीच्या आदेश काढला आहे.