‘या’ मागणीसाठी कोल्हापुरात रेशनकार्डधारकांसह दुकानदारांचा महामोर्चा

कोल्हापूर : पोलीसनामा आॅनलाइन – सर्वसामान्य गोरगरीब जनतेला रेशनवर मिळणाऱ्या धान्याऐवजी खातेदारांच्या बँकेत थेट रक्कम जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाला कडाडून विरोध करण्यासाठी व पैसे नकोत धान्य हवे, अशी मागणी करण्यासाठी जिल्ह्यातील लाखो रेशनकार्डधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. मिरजकर तिकटी येथून सुरू झालेल्या या मोर्चात शहर व ग्रामीण भागातील महिला, तरुण, तरुणी, वृद्ध मोठ्या संख्येने हजर होते. खासदार राजू शेट्टी, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, विश्वंबर बसू, काका देशमुख, पी. डी. पाटील, कॉ. चंद्रकांत यादव यांच्यासह मान्यवरांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

या निवेदनात म्हटले आहे, पूर्वीच्या सरकारने २०१३ मध्ये अन्न सुरक्षा कायदा केला. गरीब व कष्टकरी कुटुंबाला रेशनवर स्वस्त दरात धान्य मिळू लागले. मात्र विद्यमान सरकारने हा कायदा मोडून काढण्यासाठी रेशनवरील धान्य बंद करून लाभार्थ्यांच्या खात्यात रोख रक्कम जमा करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी २१ ऑगस्ट महाराष्ट्र शासनाने जी. आर. काढला असून मुंबईतील आझाद मैदान व महालक्ष्मी येथील काही दुकानात त्याची अंमलबजावणी १ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयाला महाराष्ट्रातील लोकांचा कडाडून विरोध आहे. त्यासाठीच राज्यभर धडक मोर्चा काढून सरकारच्या या धोरणाचा विरोध केला जात आहे.
आमदार सतेज पाटील म्हणाले, अच्छे दिन देतो असे सांगत सरकारने गोरगरीब लोकांच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम केले आहे. दिवाळीच्या तोंडावर गरीब लोकांना रेशनवर साखर, हरभरा डाळ, उडीद डाळ देण्याची सरकारने घोषणा केली होती. मात्र ते मिळाले नाही. कोणत्या दिवाळीत ते मिळणार आहे? असे फसवणाऱ्या सरकारला पुढील निवडणुकीत शिमगा करायची वेळ येणार आहे. जनतेने आता तलवार उपसली आहे. हा शिवरायांचा वारसा आहे. बँक खाती काढल्यावर १५ लाख जमा होणार होते ते कुठे गेले? फसव्यांना जनता कधीच माफ करणार नाही, असा आरोप सरकारवर केला.

मराठा समाजाची सरकारकडून फसवणूक : खा. सुप्रिया सुळे