श्री-लिपी चे अत्याधुनिक NXT व्हर्जन बाजारात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय भाषांसाठी तब्बल 25 वर्षांपासून वापरण्यात येणारे श्री- लिपी सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या  मॉड्युलर इन्फोटेक प्रा. लि. कंपनीने श्री – लिपीचे आधुनिक व्हर्जन श्री-लिपी एनएक्सटी हे बाजारात आणले आहे. नुकतेच श्री-लिपीला 25 वर्षे पुर्ण झाल्याबद्दल सेनापती बापट रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमामध्ये भाउसाहेब पाटील यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ संगणक तज्ञ दीपक शिकारपूरकर यांच्या उपस्थितीत या सॉफ्टवेअरचे लॉचिंग करण्यात आले.

याप्रसंगी मॉड्युलर कंपनीचे माजी संचालक आर.आर. जोशी व त्यांच्या पत्नी एम.आर.जोशी, डॉ. एम.एन. कूपर, मॉड्युलरचे वरिष्ठ व्यवस्थापक राहुल काळे, सपोर्ट आणि सर्व्हिस प्रमुख अनंत देवकर उपस्थित होते. श्री- लिपी एनएक्सटी बद्दल माहिती देताना मॉड्युलरचे टेक्निकल हेड केयूर करंबेळकर म्हणाले, की श्री लिपीमुळे सर्व भारतीयांना आपल्या मातृभाषेत संगणकाचा वापर करणे सहज शक्य झाले आहे. मागील 25 वर्षांत संगणक क्षेत्रात, तंत्रज्ञानात अनेक मोठया प्रमाणावरती बदल घडुन आले. तसेच बदलत्या काळाबरोबर ग्राहकांच्या मागण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर बदल घडले. श्री-लिपीने देखील काळाबरोबर बदलण्याचे धोरण अवलंबिले व नव-नवीन व्हर्जन बाजारात उपलब्ध करुन दिली. या प्रसंगी बोलताना कंपनीचे व्यवस्थापक श्री राहुल काळे म्हणाले, की पुढील काळामध्ये श्री लिपी सॉफ्टवेअरमध्ये अनेक युजर फ्रेंडली बदल करण्यात येणार आहेत.

नवीन व्हर्जनमध्ये आकर्षक फॉन्टस व अनेक युटीलिटीज देखील देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रासोबत अन्य राज्यांतील श्री लिपी सॉफ्टवेअर वापरकर्त्यांसाठी संपर्क अभियान राबविण्यात येणार असून श्री लिपी वापराबाबत कार्यशाळाही आयोजित करण्यात येणार आहेत. याप्रसंगी देशभरातून आलेल्या श्री -लिपी वितरकांचा सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. प्रदीप सातपुते आणि पूजा चितळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Loading...
You might also like