कंगना आणि क्रिश यांच्या वादात अपूर्व असरानीची उडी 

मुंबई : वृत्तसंस्था – ‘मणिकर्णिका’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच कमाई करत आहे. हा चित्रपट रिलीज होण्याआधी अनेक कारणाने चर्चेत होता. पहिल्यांदा कंगनाला वैतागून या चित्रपटातून सोनुने काढता पाय घेतला. तर कधी चित्रपटाच्या दिग्दर्शनावरून कंगना चर्चेत होती. तर चित्रपट रिलीज होण्यापूर्वी करणी सेना आणि कंगणामध्ये चांगली जुंपली होती. करणी सेनेने तर या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. एवढ्या सगळ्या वादा नंतर हा चित्रपट पुन्हा चर्चेत आला आहे. आता या चित्रपटाच्या दिग्दर्शनाच्या क्रेडिट वरून कंगना आणि दिग्दर्शक क्रिश यांच्यात वाद चांगलाच पेटला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक यांनी कंगनावर निशाणा साधला आहे.

‘मणिकर्णिका’ रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाचे दिग्दर्शक क्रिश यांनी कंगनावर आगपाखड केली होती. कंगनाने एका सोन्यासारख्या चित्रपटाची माती केली. ‘मणिकर्णिका’ चे ७० टक्के दिग्दर्शन मी केले आहे. मी रिलीज होईपर्यंत गप्प राहिलो. चित्रपटासाठी ज्या टीमने मेहनत केली त्यांच्यासाठी मला गप्प रहावे लागले. पण कंगनाने काय केले याबद्दल आता बोललो नाही तर माझ्या मेहनतीवर पाणी सोडल्यासारखे होईल. मी केलेले दिग्दर्शन शु्ध्द सोन्यासारखे होते, कंगनाने त्याची माती केली, असे क्रिश म्हणाले होते. याप्रकरणी आता अपूर्व असरानीने क्रिश यांची बाजू घेत कंगनावर निशाणा साधला आहे.

अपूर्व यांनी ट्विट करत म्हंटले आहे.‘तू एका ज्येष्ठ दिग्दर्शकाचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट हायजॅक केला. एका दुसऱ्या  दिग्दर्शकाला घेतले. पण चित्रपट पूर्ण झाल्यानंतर त्यालाही हाकलले आणि स्वत:च दिग्दर्शक असल्याचा दावा करू लागली. ट्रेड आणि प्रेस तुझ्या सैतानी फसवणूकला पाठींबा देत आहे. पण इतके करूनही तू एक फ्लॉप चित्रपट बनवला.

कंगनाच्या ‘सिमरन’ चित्रपटाची कथा अपूर्व यांनी लिहिली होती. पण या चित्रपटाच्या रिलीजवेळी अचानक चित्रपटाच्या कथालेखनाचे श्रेय कंगनाला विभागून दिले गेले हे पाहून अपूर्व संतापले होते. तेव्हा सुद्धा कंगना आणि अपूर्व यांचा वाद चांगलाच गाजला होता.