सिन्नरचे सुपुत्र केशव गोसावी काश्मीरमध्ये शहीद

सिन्नर : पोलीसनामा ऑनलाइन  – भारतीय सैन्य दलातील मराठा बटालीयनचे जवान केशव सोमपुरी गोसावी (वय २९, रा. शिंदेवाडी) यांचे जम्मू काश्मीर येथे आतंकवादी हल्ल्यात शहीद झाले आहेत. त्यांचे पश्चात वडील सोमगिर गोसावी, पत्नी यशोदा केशव गोसावी, दोन विवाहित बहिणी आहेत. ते वडीलांना एकुलते एक होते. त्यांच्या पत्नी गरोदर आहेत.

शहीद जवान केशव गोसावी यांचे ४ थी पर्यतचे प्राथमिक शिक्षण जि. प. शाळा शिंदेवाडी येथे, माध्यमिक शिक्षण न्यु इंग्लिश स्कुल पंचाळे येथे व १२ वी पर्यतचे शिक्षण वावी येथे झाले असून वयाच्या २९ व्या वर्षी आतंकवादी हल्ल्यात ते शहीद झाले आहेत.

मराठा लाइट इन्फन्ट्रीची तुकडी गस्त घालत असता शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पाकच्या बाजूने ‘स्नायपर’हल्ला झाला. त्यात केशव हे शहीद झाले. भारतीय लष्कराने या हल्ल्याला उत्तर देऊन पाकिस्तानी चौक्यांचे नुकसान केले. या हल्ल्यात जवान केशव गोसावी यांना गोळी लागून ते जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तेथे उपचार सुरू असताना त्यांना वीरमरण आले.

शहीद गोसावी यांचे पार्थिव विमानाने सोमवारी दुपारी १२. ३० वाजेपर्यंत ओझर विमानतळावर पोहोचणार आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजेपर्यंत पार्थिव शिंदेवाडी येथे आणण्यात येणार आहे.