Solapur News : …अन् त्या तरुणाचा 4 महिन्यांनी सांगाडा सापडला, बार्शी येथील घटना

बार्शी : पोलीसनामा ऑनलाईन –  चार महिन्यापूर्वी महापूराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा सांगाडा मंगळवारी (दि. 2) सकाळी एका झाडास अडकल्याचे आढळून आले. 14 ऑक्टोंबर 2020 रोजी बार्शी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या वेळी तो कामावरून घराकडे परतत असताना फपालवाडी रोडवरील ओढ्यातील पाण्यात वाहून गेला होता. नाका-तोंडात पाणी गेल्याने तो मयत झाला होता. तपास न लागल्याने पोलिसांत तो वाहून गेल्याची नोंद केली होती.

अजय उर्फ दादा चौधरी (वय- 40, रा. बार्शी) असे या तरुणाचे नाव आहे. तो बार्शी येथील बाजार समितीत तोलार म्हणून काम करत होता. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी हा सांगाडा बार्शी- तुळजापूर रोडवरील अशोका हाॅटेलचे मालक महेंद्र सावळे यांना दिसला. त्यांनी मयताचे नातेवाईक किशोर चौधरी यांना फोनवरून याची माहिती दिली. त्यानंतर मयताची पत्नी स्वाती, भाऊ किशोर चौधरी, सासू आशा चौधरी, चुलत भाऊ कृष्णा चौधरी आदीनी त्याठिकाणी जाऊन पाहणी केली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. चिलरीच्या झाडास अडकलेला सांगाडा दिसला. मयताच्या पत्नीने मानेच्या हाडांमध्ये अडकलेला शर्ट पाहून आणि सांगाड्याची बांधणी पतीच्या शरीरयष्टीशी मिळतीजुळती असल्याने तो सांगाडा आपल्याच पतीचा असल्याचे सांगितले.