मुलीच्या भविष्याची जाणवतेय चिंता? आता सुकन्या समृद्धी योजनेत करा गुंतवणूक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   केंद्र सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ( PPF), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ( NSC) आणि सुकन्या समृध्दी योजनेसारख्या छोट्या बचत योजनांच्या व्याज दरावर बुधवारी संध्याकाळी उशिरा कात्री लावली आणि गुरुवारी सकाळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ट्वीट करून निर्णयावर ब्रेक लावला. पण ज्या प्रकारे व्याजदराच्या कपातची घोषणा केली गेली, त्यामुळे प्रत्येक प्रकारच्या गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला. सुकन्या समृद्धि योजनेवरील व्याज दरात 0.7 % कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. सरकारने या योजनेवरील व्याज दर 7.6 टक्क्यांवरून 6.9 टक्क्यांपर्यंत कमी केले होता, जे आता मागे घेण्यात आले आहे. गुंतवणूकदारांसाठी हा मोठा दिलासा आहे.

2015 मध्ये मोदी सरकारने ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ योजनेंतर्गत सुकन्या समृद्धि योजना सुरू केली. मुलींच्या भविष्यासाठी ही एक उत्तम योजना आहे. आपण या योजनेत गुंतवणूक केल्यास आपल्याला चांगले उत्पन्न मिळते, तसेच प्राप्तिकर कपातीचा देखील दावा केला जाऊ शकतो. या योजनेंतर्गत आपण किमान 250 रुपयांच्या रकमेसह खाते उघडू शकता. दरम्यान, या योजनेंतर्गत आपण वार्षिक जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करू शकता.

कसे उघडावे खाते ?

सुकन्या समृध्दी योजनेंतर्गत अर्जदार आपल्या मुलीच्या नावे कोणत्याही बँक किंवा टपाल कार्यालयात खाते उघडू शकतात. या योजनेच्या मदतीने अर्जदार त्यांच्या मुलींचे भविष्य सुरक्षित करू शकतात. अनेक खाजगी बँकांमध्ये खाते उघडण्याची सुविधादेखील आहे. मुलीच्या नावावर एकच खाते उघडता येते. पालक 2 पेक्षा जास्त मुलींच्या नावे खाते उघडू शकतात. जुळ्या किंवा तीन मुली एकत्र असल्यास तिसऱ्या मुलीलाही त्याचा फायदा होईल.

सुकन्या समृध्दी योजनेला वार्षिक 7.6% व्याज मिळत आहे. मुल 10 वर्षाचे होईपर्यंत हे खाते उघडले जाऊ शकते. सुरुवातीच्या 14 वर्षांसाठी खात्यात पैसे जमा करावे लागतील. ही योजना 21 वर्षानंतर मॅच्युअर होते. तसेच सुकन्या समृध्दी योजनेंतर्गत खाते उघडण्यासाठी अर्जदाराला आपल्या मुलीचा जन्माचा दाखलादेखील फॉर्मसह पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जमा करावा लागेल. याशिवाय मुलीचे आणि पालकांचे ओळखपत्र (पॅनकार्ड, रेशनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट) आणि ते कोठे राहतात याचे प्रमाणपत्र (पासपोर्ट, रेशनकार्ड, विजेचे बिल, टेलिफोन बिल, पाण्याचे बिल) द्यावे लागेल.

गुंतवणूकीचे फायदे

सुकन्या समृध्दी योजनेत गुंतवणूकीसाठी आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सूट मिळू शकते. यावर इतर सर्व योजनांपेक्षा अधिक व्याज मिळते. आपण मुलीचे उच्च शिक्षण आणि लग्नासाठी बचत करू शकता. मॅच्युरिटीवर प्राप्त झालेल्या रकमेवर कर आकारला जात नाही. मॅच्युरिटी कालावधीनंतर अर्थात 21 वर्षानंतर आपण पैसे काढू शकता. दरम्यान, वयाच्या 18 व्या नंतर जर मुलीचे लग्न झाले तर ती पैसे काढून घेऊ शकते. याशिवाय वयाच्या 18 नंतर आपण मुलीच्या अभ्यासासाठी 50 टक्के रक्कम काढू शकता.