Pandharpur By Election Result : … म्हणून समाधान अवताडेंचा विजय निश्चित, पडळकरांनी सांगितलं राज’कारण’

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने प्रतिष्ठेची केलेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. पोटनिवडणुकीसाठी 17 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. आज मतमोजणी होत आहे. या पोटनिवडणुकीत भालके यांना सहानभुती मिळणार की भाजपचे समाधान अवताडें बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत एकूण 19 उमेदवार रिंगणात उतरले असले तरी खरी लढत राष्ट्रावादीचे भगीरथ भालके आणि भाजपचे समाधान अवताडे यांच्यात होत आहे.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून आमदारकीची स्वप्न पाहणाऱ्या अभिजीत बिचकुले यांना केवळ 54 मते मिळाली आहेत. तर 19 व्या फेरीअखेर इतर उमेदवारांना 1 हजाराचा टप्पा देखील पार करता आला नाही. तर भाजपचे समाधान अवताडेंचा विजय निश्चित मानला जात आहे. 29 व्या फेरीअखेर समाधान अवताडे यांची 6331 मतांची आघाडी मिळवली आहे. पंढरपुरातील निकालाबद्दल बोलताना समाधान अवताडे यांचा विजय निश्चित असल्याचे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागातून राष्ट्रवादीच्या उमेदवाराल 10-10 हजारांचे मताधिक्य मिळेल, असा आशावाद राष्ट्रवादीला होता. मात्र, यंदा प्रशांत परिचारक यांनी पंढरपूरात चांगली मोट बांधली आहे. येथील मतदारसंघातून दोनवेळा परिचारक यांना पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे, जवळ राहून अंतर्गत विरोध करणाऱ्यांना यंदा परिचारक यांनी बाजूला सारले. तर या भागातील सामाजिक कार्यकर्त्यांना जवळ घेऊन मतदारसंघात प्रचार केला. त्यामुळे राष्ट्रवादीला येथून अपेक्षीत यश मिळू शकले नाही. 18 व्या फेरीअखेरची आकडेवरी सांगताना, आता मंगळवेढा शहर आणि ग्रामीणची मतमोजणी होणार आहे. सध्या समाधान अवताडे आघाडीवर आहेत. तर आता मंगळवेढा हा त्यांचाच मतदारसंघ आहे. ते तेथील भूमिपुत्र आहेत. त्यामुळे मंगळवेढ्यात आघाडी घेऊन ते निश्चित विजयी होतील, असे पडळकर यांनी सांगितले.

दरम्यान, मतमोजणीची 30 वी फेरी संपली आहे. या फेरीअखेर समाधान अवताडे यांनी 89 हजार 307 मते पडली आहेत. तर भगीरथ भालके यांना 83 हजार 127 मते मिळाली आहेत. समाधान अवताडे हे 5 हजार 910 मतांनी आघाडीवर आहेत.