उमेदवारांच्या नावापुढं जात का लावली ? प्रकाश आंबेडकरांचा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीकडून काल (शुक्रवारी ) एकाच वेळी ३७ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. मात्र या यादीत सर्वच उमेदवारांच्या नावासमोर जातीचा उल्लेख करण्यात आला होता. याबाबत चर्चा सर्वत्र रंगली होती. यावर आता प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. निरनिराळ्या समाजातील उमेदवारांना संधी देण्यात आल्याचे आंबेडकर यांनी म्हंटले आहे. ही नवी पद्धत असून याने राजकारणाची दिशा बदलेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

ही जातीअंताच्या लढाईचीच सुरुवात

याबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले की, “आज आम्ही जात जाहीर केली. कारण ही प्रणाली कोणताही पक्ष स्वीकारत नाही. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात मराठ्यांव्यतिरिक्त कुणालाच उमेदवारी दिली जायची नाही. हीच पद्धत पुढे घराणेशाहीत बदलली. आमचं असं आहे की आम्ही एकदा निवडणूक जिंकलो की पुढे ते फक्त एक राजकीय कार्यकर्ता म्हणूनच काम करतील. आज आम्ही त्यांना फक्त कार्यकर्ता म्हणूनच तिकिट दिलं आहे. ही जातीअंताच्या लढाईचीच सुरुवात आहे’, असे आंबेडकर यांनी सांगितले”.

… ब्राह्मण किंवा सवर्ण जातींना तिकिट दिलं नाही

“जैन आणि मारवाडी समाज हा भाजपबरोबर आहे. त्यामुळे आम्ही त्यांना गृहीत धरलं नाही. जर त्यांना वाटत असेल आमच्याकडे यावं तर खुल्या मनाने त्यांनी आमच्याकडे यावं. तसेच ‘ब्राह्मण आणि कोमटी समाजातून कुणी आमच्याकडे उमेदवारी मागितली नाही. आम्हाला या समाजातून माणसंच मिळाली नाहीत’, असे आंबेडकर म्हणाले.

वंचित बहुजन आघाडीकडून शुक्रवारी ३७ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली यात आघाडीकडून वंजारी, बौद्ध, धिवर, माना आदिवासी, माळी, बंजारा, धनगर, मुस्लिम, कैकाडी, मातंग, शिंपी, कोळी, विश्वकर्मा, वडार, होलार, कुणबी, लिंगायत, भिल्ल, वारली, मराठा, आगरी अशा बहुतांश समांजांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. यात सात डॉक्टर, तीन प्राध्यापक व दोन वकिलांचा समावेश आहे.