…म्हणून परमबीर सिंगांनी PI घाडगेंना अडकवलं होतं खोट्या फायरिंगच्या केसमध्ये, पत्नीला दिला होता त्रास

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या मित्र असलेल्या बिल्डर व इतर ६ जणांना गुन्ह्यातून वगळण्यास नकार दिल्याने खोट्या फायरिंगच्या गुन्ह्यात अडकवून पोलीस निरीक्षक भिमराव घाडगे यांना परमबीर सिंग यांच्यामुळे अट्टल गँगस्टरप्रमाणे अंडासेलमध्ये ठेवण्यात आले होते. या खोट्या फायरिंगच्या गुन्ह्यातून न्यायालयाने भिमराव घाडगे यांची निर्दोष मुक्तता केली होती.

भिमराव घाडगे यांच्या फिर्यादीनंतर अकोला पोलिसांनी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह ३३ अधिकारी, कर्मचार्‍यांविरुद्ध अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल केला आहे. भिमराव घाडगे हे इतके टोकाला का गेले, यामागील हकीकत समोर आली आहे. आपले ऐकत नसल्याने चिडलेल्या परमबीर सिंग यांनी घाडगे यांना कसे अडकविले, त्यांना दहशतवाद्यांप्रमाणे कसे अंडासेलमध्ये ठेवायला भाग पाडले हे आता समोर आले आहे.

परमबीर सिंग यांच्या जवळच्या ६ व्यक्तींवर गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल होता. त्याचा तपास भिमराव घाडगे हे करत होते. या गुन्ह्यात एकूण २६ आरोपी निष्पन्न झाल्याने तत्कालीन सह पोलीस आयुक्त व्ही व्ही़ लक्ष्मीनारायण यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक भिमराव घाडगे यांनी गुन्हा दाखल केला होता. त्यात लाच लुचपत प्रतिबंधक कलमही समाविष्ट केले होते.

तत्कालीन ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी घाडगे यांना १५ एप्रिल २०१५ रोजी ठाणे पोलीस आयुक्तालयात बोलावले. यावेळी त्यांनी या ६ जणांना या गुन्ह्यातून वगळण्याचा तोंडी आदेश दिला. त्यावेळी घाडगे यांनी सहआयुक्त लक्ष्मीनारायण यांच्या आदेशाने तपास सुरु आहे, असे सांगितले. तेव्हा परमबीर सिंग यांनी मी पोलीस आयुक्त आहे़, मला लक्ष्मीनारायण यांचे नाव सांगू नका, मी आदेश देत आहे, असे तोंडी सांगितले. मात्र, घाडगे यांनी या गुन्ह्यातून त्यांना वगळण्यास नकार दिला.

त्यामुळे परमबीर सिंग यांच्या सांगण्यावरुन इतर पोलीस अधिकार्‍यांनी घाडगे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले होते. इतकेच नाही तर घाडगे व त्यांची पत्नी यांना एखाद्या कुख्यात गुन्हेगारासारखी वागणूक देण्यात आली. त्यांना नवी मुंबई येथील तळोजा कारागृहात अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले होते. कोणताही गुन्हा नसताना घाडगे व त्यांच्या पत्नीने तब्बल एक वर्षे दोन महिने अंडासेलमध्ये घालवावे लागले, इतकी परमबीर सिंग यांची त्यावेळी पोलिसांमध्ये दहशत होती. त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यातून न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटका केली आहे.