ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले – ‘राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही’

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून अनेक निर्बंध लावले जात आहेत. त्यामुळे राज्यातील काही मंत्र्यांकडून पुन्हा लॉकडाऊनचे संकेत दिले जात आहेत. मात्र आता ठाकरे सरकारमधील राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही असे मोठे विधान केले आहे.

इंदापूरातील शासकीय विश्रामगृहात वाढत्या कोरोना संदर्भात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते म्हणाले की, लॉकडाऊन होणार नाही, परंतू जनतेने काळजी घेणे गरजेचे आहे. शासनाने निर्देशित केलेले नियमांचे काटेकोर पालन करावे. लॉकडाऊन जाहीर झाले तर काहीजण विनाकारण लॉकडाऊनच्या नावाखाली साठेबाजी करतात. शेतमालाचे बाजार भाव पाडतात असे प्रयत्न होत असतात. त्यामुळे लॉकडाऊन होणार नाही. तसेच लॉकडाऊनच्या होण्याच्या भीतीने शेतकरी 100 रुपयांची वस्तू 70 रुपयाला विकत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात 76 तर शहरात 32 रुग्ण हे कोरोनाबाधित आहेत. अशा 108 व्यक्तींवर सध्या उपचार सुरु आहे. ग्रामीण भागातील भिगवण आणि पळसदेव या दोन गावात रुग्णांची संख्या अधिक असून कोरोनाचे संकट संपले नसल्याचे ते म्हणाले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. भगवान पवार, नायब तहसीलदार अनिल ठोंबरे, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, वैद्यकीय अधिकारी डाॅ. प्रशांत महाजन यांसह विविध अधिकारी उपस्थित होते.