सोशल मिडीयाच्या मायानगरीत संवेदनांचा लोप

पोलीसनामा आॅनलाईन
अशोक मोराळे

कार चालवताना इन्स्टाग्रामवर लाइव्ह करण्याच्या नादात काल पिंपरी चिंचवडमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला. कार चालवत असताना सोशल मिडीयाचा उपयोग करुन आपल्या कारचा वेग मित्रांना दाखवण्याची हौस या तरुणाच्या जीवावर चांगलीच बेतली. त्यामुळे परत एकदा सोशल मिडीयाचा जीवघेणा आजार भारतीय तरुणांच्या मृत्यूचे कारण बनतो आहे. जर एखाद्या ठिकाणी अपघात घडला तर अपघातग्रस्तांना मदत करण्याएेवजी आपण त्या घटनेचे चित्रीकरण करण्यात दंग असतो. आपल्याला याचे भानसुद्धा राहत नाही की, आपण कशाचे चित्रण करत आहोत. जे फोटो आपल्याकडे आहेत ते सोशल मिडीयावर प्रसारित करण्याची सवयच आता या संवेदनाहीन जगात माणुसकी शिल्लक राहिलेच कुठे?

सेल्फीचा नाद जीवघेणा
काही दिवसांपूर्वी तरुणांनी सेल्फीच्या नादात आपले जीव गमवले. मग ती समुद्र किनाऱ्यावरील सेल्फी असो किंवा एखाद्या उंच कठड्यावरील. माझा सेल्फी सर्वात वेगळा कसा असेल व त्याला जादा लाईक्स, कमेंट कशा मिळतील हा अट्टाहास जीवघेणा ठरत आहे. मुळात सेल्फी काढणे किंवा फेसबुक लाईव्ह करणे वाईट नाही. परंतु काढण्याची पद्धत आणि वेळ चुकीची ठरत आहे.

सोशल मिडीयाचा जडतोय आजार
काही व्यक्तींना सेल्फीचा आजार जडतो आहे. दिवसभर पाच पेक्षा जास्त फोटो काढणे, धोक्याच्या ठिकाणी जाऊन फेसबुक लाईव्ह करणे आणि ते सोशल मिडीयावर अपलोड करणे किती लाईक आल्या, किती कमेंट आल्या मग माझ्या मित्राच्या फोटोला एवढ्या जास्त लाईक आल्या, मात्र माझ्या फोटोला का आल्या नाहीत या सर्व सवयीमुळे तरुणाईमध्ये न्यूनगंड निर्माण होत आहे. त्यातूनही आत्महत्या केल्याची काही तुरळक उदाहरणे आहेत.

अशा या भयानक आजाराचा बळी तुमचा मुलगा किंवा मुलगी पडत नाही ना? याकडे लक्ष द्या. अल्लड वयात त्यांना नको त्या गोष्टींची ओळख करून देऊ नका. दिलीत तर त्याचा गैरवापर होणार नाही त्याचे दुष्परिणाम देखील समजावून सांगा. कदाचित यामुळे भविष्यात भारताचाही तरुण जे संपत्ती मानले जातात ते टिकतील.